बालाकोटच्या ‘एअर स्ट्राइक’मध्ये ३०० दहशतवादी मेलेत – आगा हिलाली

Agha Hilaly

इस्लामाबाद :  पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर (Pulwama Attack) भारताने २६ फेब्रुवारी २०१९ ला थेट बालाकोटमध्ये (Balakot) घुसून जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) तळावर केलेल्या ‘एअर स्ट्राइक’मध्ये ३०० दहशतवादी मारले गेले होते, अशी कबुली पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. या हल्ल्यात भारताच्या मिराज फायटर विमानांमधून दहशतवादी तळांवर बॉम्बफेक करण्यात आली होती. या हल्ल्यात मोठ्या संख्येत दहशतवादी मारले गेले होते; पण पाकिस्तान हे मान्य करत नाही.

आगा हिलाली टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत म्हणालेत, भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेले. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाल्यानंतर भारताने ही कारवाई केली होती. “भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून युद्धाची कृती केली. ३०० जण ठार झालेत. त्यांच्या लक्ष्यापेक्षा आपले लक्ष्य वेगळे होते. आपण त्यांच्या ‘हाय कमांड’ला लक्ष्य केले.” असे आगा हिलाली (Agha Hilaly) यांनी सांगितले. बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं होतं. पण त्याचे ठोस पुरावे न दिसल्यामुळे अनेकांनी एअर स्ट्राइकच्या यशाबद्दल शंका घेतली होती. खरं तर बालाकोटमध्ये भारतीय फायटर विमानं आपल्या लक्ष्यापासून चुकण्याची शक्यता अत्यंत धूसर होती. कारण या हल्ल्यात इंडियन एअर फोर्सने ‘स्पाइस २०००’ बॉम्बचा वापर केला होता.

या स्पाइस किटची निर्मिती इस्रायलमधल्या कंपनीने केली आहे. या किटमध्ये कॅमेरा, मेमरी चीप आणि जीपीएस असते. ज्याच्या मदतीने लक्ष्यावर अचूक प्रहार करता येतो. एकदा लक्ष्य निश्चित झाले की, या स्मार्ट किटच्या मेमरी चीपमध्ये सर्व माहिती सेट केली जाते. टार्गेटचे जीपीएस लोकेशन, उपग्रहामार्फत घेतलेले फोटो, लक्ष्याच्या आसपास काय आहे त्याची माहिती मेमरी चीपमध्ये सेट केली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER