भाजपाच्या 30 विद्यमान आमदारांना डच्चू मिळण्याची शक्यता

Devendra Fadnavis

नवी दिल्ली : भाजपाची उमेदवार यादी अद्याप जाहीर झाली नसली तरी आमदार म्हणून 30 जणांच्या कामकाजाबाबत पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवर नाराजी असल्याने पक्षाच्या या 30 विद्यमान आमदारांना तिकीटवाटपापत डच्चू दिला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही या 30 आमदारांवर त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नाराज असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची पहिली यादी 29 सप्टेंबरला येण्याची शक्यता आहे. पितृपक्षामुळेही ही यादी जाहीर करण्याचे टाळले जात असल्याची माहिती आहे. राजधानीत पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत जागावाटपांवर प्रदीर्घ चर्चा झाली असून शिवेसेनेसह व शिवसेनेशिवाय अशा देन्ही स्थितीत लढवायच्या निवडणूक तंत्राबद्दलही यावेळी चर्चा झाल्याचे समजते.

बैठकीला पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणववीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होते.

शिवसेनेसोबत करावयाच्या जागावाटपावर आम्ही अंतर्गत चर्चा केली, परंतू निर्णय केंद्रीय निवडणूक समिती (सीईसी) बैठकीत होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भाजपच्या मुख्यालयात झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की आम्ही आज सर्व 288 जागांवरील उमेदवारीवर चर्चा केली. भाजपा कुठे-कुठे जास्त चांगल्या स्थितीत असल्याचा आढावा घेतला. उमेदवार निवडीचा अंतिम निर्णय मात्र पुढील सीईसीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. सीईचीची बैठक केव्हा होणार? या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन बाळगले. भाजपच्या संसदीय समितीची बैठक 29 तारखेला बोलावली असल्याचे ते म्हणाले.