कोपर्डी बलात्कार-हत्याप्रकरण : तीन वर्षांनंतरही कुटुंब पोलीस संरक्षणात

Ahmednagar

अहमदनगर : आजच्याच दिवशी तीन वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्हा एका थरारक घटनेने हादरून गेला होता. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण  हत्या करण्यात आली होती. त्या घटनेला आज तीन वर्षे  झाली. मात्र अद्यापही हे कुटुंब पोलीस संरक्षणात न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. त्या अमानुष दुर्घटनेनंतर हे कुटंब अजूनही  दहशतीखालीच वावरत आहे.

तीन वर्षांपूर्वी नववीत शिकणाऱ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा त्याच गावातील तीन नराधमांनी बाईकवरून पाठलाग केला. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिची अमानुष हत्या केली.

या घटनेनंतर राज्यासह देशात खळबळ उडाली होती. तर पीडित कुटुंबाला आजही पोलीस संरक्षणाखाली राहावे लागत आहे. तीन वर्षांपासून या परिसरात पोलीस छावणी तैनात आहे.

कोपर्डी बलात्कारानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. या घटनेचा निषेध म्हणून मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले. औरंगाबादेत ९ ऑगस्ट २०१६ रोजी पहिला मराठा मूक मोर्चा निघाला. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात विशाल संख्येने मोर्चे काढण्यात आले. कोपर्डी बलात्कारातील आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांनाही नगरच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी हा निकाल देण्यात आला.

ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी त्यावेळी पीडितेची बाजू मांडली. तर आरोपींच्यावतीने अॅड.  बाळासाहेब खोपडे यांनी युक्तिवाद केला. नगरच्या विशेष न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. या  शिक्षेविरोधात आरोपी संतोष भवाळने उच्च न्यायालयात अपील दाखल केलं. तर दुसरीकडे राज्य सरकारने फाशीच्या शिक्षेच्या पुढील कार्यवाहीसाठी औरंगाबाद खंडपीठात वैधानिक अपील केलं आहे.

ही बातमी पण वाचा : श्रीदेवींचा मृत्यू अपघात नव्हे तर खून