कर्जाचे हप्ते भरण्यासाठी आणखी ३ महिने मुदतवाढ

Shaktikant Das

नवी दिल्ली : बँकेच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठीची मुदत तीन महिने वाढवण्यात आल्याची घोषणा आज रिझर्व्ह बँकेने केली आहे. बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज लाईव्ह पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सांगितले की, ऑगस्टपर्यंत ईएमआय भरता आला नाही तरीही त्याचा दंड किंवा क्रेडिट रिपोर्टवर परिणाम होणार नाही.

कोरोनामुळे आर्थिक व्यवहार जवळ-जवळ ठप्प झाल्याने जिडीपीलाही मोठा धक्का बसला आहे. यावर्षी जीडीपीचा दर शून्यापेक्षा खाली जाऊ शकतो, असा अंदाज दास यांनी व्यक्त केला.

याशिवाय रेपोरेट ४.४ वरून कमी करून ४ टक्के करण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे. महागाई दर नियंत्रणात राहील अशी अपेक्षा बँकेने व्यक्त केली आहे. संपूर्ण जगाचा प्रवास मंदीच्या दिशेने सुरु आहे असे शक्तीकांत दास म्हणाले.

रेपो व रिव्हर्स रेपो रेट

बँका, रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीचे कर्ज घेतात; त्यावर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. तसेच ज्यावेळी बँका त्यांच्याजवळचा निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करतात त्यावर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला