नोटाबंदीतील २७५ कोटी कोणाचे?

कोल्हापूरात मध्यवर्ती बँकेच्या सभेत प्रश्नाने संचालक मंडळाची गोची

IMG_20190828_134742 (1)

कोल्हापूर :- नोटाबंदीच्या काळात बँकेकडे २७५ कोटी रुपये जमा झाले. यातील २५ कोटींची रक्कम अध्याप पडून आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ. हसन मुश्रीफ यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत दिली. यावर सभासद अशोक पवार व बळी पाटील यांनी नोटाबंदीत असे पैसे भरून घेणाऱ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई तर करा किंवा सत्कार तरी करा. हे पैसे कोणाचे आहे ते जाहीर करा, अशी मागणी केली. यावर आ.  मुश्रीफ यांनी बँकेत भेटा.  एकट्याला यादी देतो असे सांगून वेळ मारून नेली. या प्रश्नाने काही काळ काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता असलेले संचालक मंडळ अस्वस्थ झाले.

ओला दुष्काळ व कोल्हापूर-सांगलीतील महापूर ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा, पूरबाधित पिकांना एकरी एक लाख रुपये मदत द्या, पूरबाधित क्षेत्रातील एक हेक्टरपर्यंत पिकास कर्जमाफी न देता क्षेत्राची अट रद्द करा. अतिवृष्टीने बाधित पिकांनाही नुकसान भरपाई द्या. एफआरपीसाठी ५०० रुपयांची मदत करा. घरांची पडझड झालेली आहे त्यांना कर्नाटक शासनाच्या धर्तीवर पाच लाख रुपये द्यावेत. गुऱ्हाळ घरांना नुकसान भरपाई द्या. कर्जमाफीमध्ये खावटी कर्जाचा समावेश करावा. विमा नसलेल्या व्यावसायिकांना मूल्यांकन करून नुकसान भरपाई द्यावी, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, रोपवाटिका, कुक्कुटपालन शेड, पंचनामे करून नुकसान भरपाई द्या. म्हैस रु.८० हजार, गाय रु.७० हजार, शेळी रु.५ हजार नुकसान भरपाई द्या.  नुकसानग्रस्त यंत्रमागधारकांना भरपाई द्या. पूररेषेत येणा-या पडक्या घरांना बांधकामाकरिता लातूर भूकंप पॅटर्नप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी, असे ठराव जिल्हा बँकेच्या ८१व्या सभेत एकमताने मंजूर करण्यात आले.