२७ विदेशी तब्लिगींना हमीपत्र देऊन मायदेशी जाण्याची मुभा

नवी दिल्ली : दिल्लीत दाखल केलेल्या खटल्यात ज्यांना खालच्या न्यायालयाने पूर्णपणे आरोपमुक्त केले आहे पण ज्या निकालाविरुद्ध सरकारने अद्याप अपील केलेले नाही अशा २७ विदेशी ‘तब्लिगीं’ना, जर अपील दाखल केले गेले तर त्याच्या सुनावणीच्या वेळी हजर होण्याचे हमीपत्र देऊन मायदेशी परत जाण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली.

हे ‘तब्लिगी’ अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, सुदान, ट्युनिशिया, श्रीलंका, तांझानिया, थायलँड, कझागस्तान व इंडोनेशिया इत्यादी देशांचे आहेत. हे सर्व जण गेल्या फेब्रुवारी-मार्चमध्ये दिल्लीत मरकाझ येथे झालेल्या ‘तब्लिगी जमात’च्या धार्मिक परिषदेसाठी वैध व्हिसा घेऊन आले होते. परंतु नंतर ‘लॉकडाऊन’ सुरु झाल्याने ते अडकले. व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करून धर्मप्रचाराचे काम करणे व ‘लॉकडाऊन’च्या निर्बंधांचे उल्लंघन करून कोरोना महामारीच्या प्रसाराचा धोका निर्माण करणे या आरोपांवरून अटक करून त्यांच्यावर खटले भरले गेले होते.

मूळ खटले एकूण ३५ तब्लिगींवर भरले गेले होते. दिल्लीच्या महानगर दंडाधिकाºयांनी त्या सर्वांना पुराव्याअभावी आरोपमुक्त केले. त्यापैकी आठजणांच्या आरोपमुक्तीविरुद्ध सरकारने केलेला पुनरिक्षण अर्जही सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर ते आठजण, सरकारने अपील केले तर आम्ही त्याच्या सुनावणीसाठी परत येऊ, अशी हमी सत्र न्यायालयात देऊन आपापल्या देशात परत गेले आहेत.

तब्लिगींच्या ज्येष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांनी ही पार्श्वभूमी निदर्शनास आणून न्या. अजय खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठास अशी विनंती केली की, हे २७  तब्लिगीही त्या ३५ जणांपैकीच आहेत. यांच्याविरुद्ध तर सरकारने अद्याप आरोपमुक्तीच्या फेरविचारासाठीही अर्ज केलेला नाही. त्यामुळे त्यांनाही आधीच्या आठ तब्लिगींप्रमाणे न्यायालयास हमीपत्र देऊन मायदेशी परत जाण्याची मुभा द्यावी.

केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांनी सांगितले की, या २७ जणांच्या आरोपमुक्तीच्या फेरविचारासाठी सत्र न्यायालयात अर्ज करण्यावर सरकारचा विचार सुरु आहे. पण अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र तरीही हमीपत्र देऊन या २७ जणांनाही मायदेशी परत जाऊ देण्यास सरककारचा आक्षेप नाही. त्यानुसार खंडपीठाने आदेश दिला. मात्र या २७ तब्लिगींना सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे हमीपत्र द्यावे लागेल.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER