२७ कोटींच्या भूमिगत पार्किंग प्रकल्पाला ठाणेकरांचा विरोध

Underground Parking Thane

मुंबई : ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील गावदेवी मैदानामध्ये २७ कोटींहून अधिक रक्कम खर्चून भूमिगत वाहनतळ प्रकल्प उभारण्यात आला आहे . मात्र या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे . या प्रकल्पामुळे गावदेवी मैदानाचे मोठे नुकसान तर होतच आहे; शिवाय या भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न आणखी बिकट होईल, अशा तक्रारी ठाणेकर आणि तज्ज्ञ मंडळींनी केल्या आहेत.

या प्रकल्पाची रचना राष्ट्रीय इमारत संहितेकडे दुर्लक्ष करून अतिशय धोकादायक पद्धतीने केली जात असल्याच्या तक्रारीही पुढे आल्याने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. ठाणे रेल्वेस्थानकालगत वाहनतळाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून थेट गावदेवी मैदानात वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला. जुन्या ठाण्यात मुळात मैदानांची वानवा आहे.

असे असताना शहरातील ऐतिहासिक गावदेवी मैदानाचा या प्रकल्पासाठी बळी दिला जात असल्याच्या तक्रारी असून या भागातील रहिवासी तीव्र विरोध करू लागले आहेत. गावदेवी मैदान हे शहरातील महत्त्वाचे ठिकाण असून या परिसरात आर्य क्रीडा मंडळ, ठाणे महापालिका परिवहन बसथांबा आणि भाजी मंडई आहे. त्यामुळे हा परिसर सतत वर्दळीचा असतो. त्यातच या ठिकाणी भूमिगत पार्किंग प्रकल्प उभा राहिल्यास मोठी वाहतूक कोंडी निर्माण होईल, अशी तक्रार स्थानिक रहिवाशांकडून महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

शहरातील मैदानांची संख्या आधीच कमी आहे. त्यातच हा प्रकल्प उभा राहिल्यास ऐतिहासिक गावदेवी मैदान नष्ट होणार असून अरुंद असलेल्या नौपाड्यातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी या भूमिगत पार्किंग प्रकल्पाचा फेरविचार करावा, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER