मंदिराच्या हत्तीने जखमी केलेल्या मुलीला २५ लाख भरपाई व नोकरी

madras High Court
  • तमिळनाडूतील प्रकरणात २० वर्षांनी न्याया

चेन्नई : तमिळनाडू सरकारच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या देवस्थानमधील एका पिसाळलेल्या हत्तीने जखमी केल्याने आयुष्यभरासाठी अपंग झालेल्या एका मुलीला त्या राज्याच्या सरकारने २५ लाख रुपये भरपाई आणि अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला.

अरुलमिगु मरिअम्मन देवस्थानात सन १९९९ मध्ये ही दुर्घटना घडली तेव्हा सिंधू लक्ष्मी नावाची ही मुलगी अवघी तीन वर्षांची होती. आज ती २३ वर्षांची आहे. देवस्थानच्या हत्तीने तिला सोंडेत पकडून भिरकावून दिले होते. ती दूरवर लोखंडी कुपणावर जाऊन पडली. कुंपणाच्या लोखंडी खांबाचे टोक गळयात घुसल्याने तिचे स्वरयंत्र तुटले व श्वासनलिकाही फुटली. नानापरीचे उपचार करूनही ती पूर्ण बरी होऊ शकलेली नाही. आजही लक्ष्मी सिंधूच्या घशात श्वसनासाठी कृत्रिम नळी घातलेली असून तिची वाचा गेली आहे. ती फक्त द्रव पदार्थच गिळू शकते.

बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या लक्ष्मीच्या कुटुंबाचे लाखो रुपये तिच्या उपचारांवर खर्च झाले. कित्येक वर्षे सरकार दरबारी अर्ज विनंत्या करूनही कोणी दाद लागू दिली नाही. शेवटी लक्ष्मीने उच्च न्यायालयात याचिका केली. तिने सरकारकडून फक्त भरपाईची मागणी केली होती. परंतु न्या. कृष्णन रामस्वामी यांनी म्हटले की, या प्रकरणातील तथ्ये पाहता खरे तर एक कोटी रुपयांची भरपाई द्यायल हवी. परंतु केवळ पैशाच्या रुपाने भरपाई देऊन पूर्ण न्याय होणार नाही. लक्ष्मीला स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठ तिला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचाही आदेश त्यांनी दिला. लक्ष्मी कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवीधर आहे. हे पाहता देवस्थान व्यवस्थापन खात्यात तिच्या पात्रतेची नोकरी तिला द्यावी, असे न्यायालयाने सांगितले.

मुळात लक्ष्मीला हत्तीने जखमी केलेच नव्हते. जमलेल्या लोकांनी हत्तीच्या वागण्याचा चुकीचा अर्थ घेतला. त्यामुळे धावाधाव व चेंगराचेंगरी झाली, असा पवित्रा घेत सरकारने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. तसेच नोकरीला विरोध करून वैद्यकीय खर्चाच्या भरपाईपोटी ३.४ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. परंतु हे साफ फेटाळून  न्यायालयाने म्हटले की, माहुताच्या निष्काळजीपणानेच हत्ती पिसाळला हे उपलब्ध तथ्यांवरून स्पष्ट होते. माहूत सरकारचा कर्मचारी असल्याने सरकार जबाबदारी टाळू शकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER