शहरातील २३९ नाल्यांची तर १६ हजार चेम्बर्सची स्वच्छता

The cleanliness of the chambers

नागपूर : पावसाळ्यात नदी, नाले चोक होतात. नाल्यांचे व गटारीचे घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरते. यासाठी शहरातील नाल्यांची स्वच्छता मोहिमेला गेल्या महिन्यात सुरुवात करण्यात आली होती. शहरात २३९ नाले असून शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता व्हावी, यासाठी मनपाच्या दहा झोनमध्ये ७८ छोटे जेसीबी, पोकलेन व टिप्पर तसेच १६१ कामगार उपलब्ध करण्यात आले होते. नाले स्वच्छ झाल्याने पावसाळ्याच्या दिवसात नाले तुंबण्याचा धोका कमी झाला आहे. नाल्याच्या काठावरील वस्त्यात पुराचे पाणी शिरणार नाही, असा विश्वास आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांनी व्यक्त केला.

सुरुवातीला नाले स्वच्छतेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे पावसाला सुरुवात होण्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता होईल की नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु यंदा मान्सून लांबल्याने स्वच्छतेसाठी अवधी मिळाला. त्यामुळे नाले स्वच्छ करणे शक्य झाले.

शहरात एकूण २३९ नाले आहेत. गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक ५१ नाले आहेत. सर्वांत कमी १४ नाले हनुमाननगर झोनमध्ये आहेत. शहरातील तीन नद्यांचे पाणी अतिवृष्टीमुळे शहरात शिरू नये, यासाठी नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सोबतच नाले स्वच्छतेलाही सुरुवात करण्यात आली होती. बहुसंख्य नाले हे वस्त्यांना लागून असल्याने व नाल्यांचे पात्र अरुंद असल्याने तासाभराच्या पावसातही ते तुडुंब भरून वाहतात. वस्त्यात पाणी शिरण्याचा धोका असतो. यामुळे पुरासारखी परिस्थिती निर्माण होते. अनेक वस्त्यांमधील नाल्यांच्या चेम्बरमधून सिवर लाईन जोडल्यामुळे नाले दुथडी भरून वाहतात. यामुळे नाल्यांसोबत चेम्बरचीही स्वच्छता करण्यात येते. शहरात एकूण १६ हजार ३३८ चेम्बर्स आहेत. त्यापैकी १५ हजार ९६६ चेम्बर्सची स्वच्छता झाली आहे. अद्याप १७७ चेम्बर्सची स्वच्छता शिल्लक आहे.मोठ्या नाल्यांची स्वच्छता छोटे पोकलॅण्ड उतरवून करण्यात आली. नाल्यांतील पाणी शहरातील तीनही नद्यांमध्ये मिसळते. त्यामुळे नद्यांसोबतच नाल्यांची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी महत्त्वाची ठरते. तीन वर्षांपूर्वी शहरातील दोन झोनमध्ये नाल्यात काही जण वाहून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

झोननिहाय नाल्यांची संख्या
लक्ष्मीनगर      २२
धरमपेठ         ३५
हनुमाननगर    १४
धंतोली          १८
नेहरूनगर       १५
गांधीबाग        ५१
सतरंजीपुरा      २२
लकडगंज        १५
आसीनगर       १८
मंगळवारी       २९
एकूण           २३९