भारतीय क्रिकेट संघासाठी 2021 ‘नॉन स्टॉप’

Indian Cricket Team

कोरोनामुळे (Corona) यंदा जवळपास सहा महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट (Cricket) ठप्प पडल्यावर भारतीय क्रिकेट संघासाठी आता 2021 हे ‘नॉन स्टॉप’ वर्ष ठरणार आहे. या वर्षभरात विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याच्या सहकाऱ्यांना अजिबात उसंत मिळणार नाही. प्रत्येक महिन्यात त्यांना कोणती ना कोणती मालिका खेळायची आहे. 2021 मध्ये भारतीय संघ एकूण 14 कसोटी, 16 वन डे आणि 23 टी-20 सामने खेळणार आहे. याशिवाय जूनमध्ये टी-20 आशिया कप, आॕक्टोबरमध्ये आयसीसी वर्ल्ड कप (World Cup) आणि बहुदा मार्च ते मे मध्ये भारतीय क्रिकेटपटू आयपीएलमध्ये व्यस्त असतील. या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) व्हायची आहे. परंतु एका संकेतस्थळाला मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जवळपास हा कार्यक्रम निश्चित आहे.

या पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंसाठी एवढा व्यस्त कार्यक्रम थकवणारा आहे पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आपले ठरलेले सामने व मालिका पूर्ण करणे आवश्यक आहे.,सुदैवाने आपल्याकडे प्रतिभावान दर्जेदार खेळाडूंची कमी नाही त्यामुळे सर्वांना पुरेशी विश्रांती देता येईल. खेळाडूंना आलटून पालटून (रोटेशन) खेळविण्याची पध्दती अवलंबावी लागेल हे निश्चित.

अघोषीत कार्यक्रमानुसार भारतीय संघ आॕस्ट्रेलियातून परतल्यावर भारतातच इंग्लंडविरुध्द प्रत्येकी चार कसोटी, वन डे व टी-20 सामने खेळणार आहे. त्यानंतर मार्च ते मे मध्ये आयपीएल 2021 चे आयोजन होण्याची शक्यता आहे. आयपीएल 2020 नुकतेच आटोपले असून आता खेळाडूंना व फ्रँचाईजीना फारच कमी वेळ तयारीसाठी मिळणार आहे.

आयपीएल 2021 नंतर जूनमध्ये श्रीलंका दौऱ्याचे नियोजन आहे. तेथे तीन वन डे आणि पाच टी-20 सामन्यांचे नियोजन आहे. त्यापाठोपाठ आशिया कप 2021 स्पर्धा श्रीलंकेतच खेळली जाणार आहे.

जुलैमध्ये भारतीय संघ तीन वन डे सामन्यांसाठी झिम्बाब्वेचा दौरा करेल. यावेळी नियमीत ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाईल अशी शक्यता आहे.

जुलैपासून दोन महिने इंग्लंड दौऱ्याचे नियोजन आहे. त्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ आॕक्टोबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकन संघ भारतात येईल. त्यावेळी तीन वन डे आणि पाच टी-20 सामन्यांचे नियोजन आहे.

यानंतर लगेचच टी-20 विश्वचषक स्पर्धा होईल. आॕक्टोबर- नोव्हेंबर हे दोन महिने यात भारतीय संघ व्यस्त असेल.

विश्वचषक आटोपल्यावरही भारतीय क्रिकेटपटूंना उसंत मिळणार नाही कारण लगेचच नोव्हेंबर -डिसेंबरमध्ये न्यूझीलंडचा संघ भारतात दोन कसोटी आणि तीन टी-20 सामने खेळेल. त्यानंतर तीन कसोटी व तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. याप्रकारे 2021 मध्ये भारतीय क्रिकेट संघाला सतत एकापाठोपाठ सामने खेळायचे आहेत.

2022 मध्ये जानेवारी व फेब्रुवारीत विंडीज संघ भारतात खेळेल. फेब्रुवारी -मार्च 2022 मध्ये श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर असेल. मार्चमध्ये भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर आयपीएल 2022 चे आयोजन होईल. जुलै 2022 पासून भारतीय संघ इंग्लंड व वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असेल. सप्टेंबरमध्ये आशिया कप 2022 चे नियोजन आहे. त्यापाठोपाठ आॕस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ व्यस्त राहिल. नोव्हेंबर 2022 मध्ये बांगलादेश दौरा होईल आणि 2022 ला निरोप भारतात श्रीलंकेचा संघ वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

2021 मधील सामने

इंग्लंडचा भारत दौरा
4 कसोटी
4 वन डे
4 टी-20 सामने

श्रीलंका दौरा
3 वन डे
5 टी-20 सामने

आशिया कप टी-20 सामने

झिम्बाब्वे दौरा
3 वन डे सामने

इंग्लंड दौरा
5 कसोटी

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा
3 वन डे
5 टी-20 सामने

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा

न्यूझीलंडचा भारत दौरा
2 कसोटी
3 टी-20 सामने

दक्षिण आफ्रिकेचा दौरा
3 कसोटी
3 टी-20 सामने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER