अजित पवारांच्या फिरकीमुळे भाजप आमदारांच्या पोटात गोळा

2019 Lok Sabha election; Ajit Pawar's u turn BJP MLAs in tension

पुणे (खास प्रतिनिधी) : सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण, याबद्दल तर्कवितर्क चालू आहेत. याच अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातल्या वडगाव शेरी मतदारसंघातील भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांची फिरकी घेतली. पवारांच्या प्रश्नामुळे मुळीक गांगरुन गेल्याचे पाहण्यास मिळाले.

ही बातमी पण वाचा : पाकिस्तानी कलाकारांना काम देऊ नका ; अन्यथा मनसे धडा शिकवेल

एका जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार आणि मुळीक एकत्र आले होते. “काय जगदीश तू लोकसभा लढवणार आहेस म्हणे. पण खर्च भरपूर करण्याची तयारी ठेव. समोर संजय काकडे असतील,” असा थेट सल्ला पवारांनी मुळीक यांना दिला. पवारांच्या या वक्तव्यावर मुळीक यांनी उमेदवारीबद्दल मला काही माहिती नाही, असे सांगत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र संजय काकडे यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी मिळाल्यास साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा यथेच्छ वापर येत्या निवडणुकीत होणार असल्याचे सूतोवाच अजित पवारांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांना हवी आहे राज ठाकरेंची साथ!

पुण्यातल्या तरुण मतदारांची लक्षणीय संख्या लक्षात घेता सन 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपकडून ‘नवा चेहरा’ रिंगणात उतरवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यमान भाजप खासदार अनिल शिरोळे पुन्हा निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनीही तयारी चालू केली आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार गिरीश बापट यांनीही लोकसभेसाठी मोर्चेबांधणी चालवली आहे. मात्र कॉंग्रेस आघाडीचा उमेदवार मराठा असल्यास भाजपलाही मराठा उमेदवार द्यावा लागेल, असे सांगितले जाते. त्या स्थितीत बापटांची उमेदवारी मागे पडते. शिरोळे आणि गोगावले हे दोन्ही उमेदवार साठीच्या घरातले आहेत.

या पार्श्वभूमीवर सन 2014 मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवून जिंकणारे जगदीश मुळीक आणि कोथरुड मधून सातत्याने नगरसेवक म्हणून निवडणून येणारे मुरलीधर मोहोळ या मराठा समाजातल्या दोन तरुण चेहऱ्यांचा विचार भाजपकडून चालू झाला आहे. धनशक्तीच्या बाबतीत मुळीक हे मोहोळ यांना वरचढ आहेत. शिवाय वडगाव शेरी हा भाजपचा पारंपरिक मतदार नसलेल्या भागातून ते निवडून आले आहेत. परिणामी मुळीक यांची उमेदवारी भाजपसाठी अनुकूल ठरेल, असा मतप्रवाह आहे.

ही बातमी पण वाचा : स्थायी समिती पुर्नगठीत करण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही

भाजपचे उमेदवार कोण ही चर्चा ऐरणीवर आलेली असतानाच अजित पवारांनी मुळीक यांना संजय काकडेंचा संदर्भ देत थेट आव्हान दिले. पाठोपाठ काकडे यांनी अजित पवारांची भेट घेतल्याची छायाचित्रेही सोशल मिडीयातून प्रसारीत करण्यात आली. उमेदवारीसाठी काकडे भाजपकडून इच्छूक होते. मात्र त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा त्यांचा दावा आहे. “मुख्यमंत्र्यांना भावासारखे मानले. परंतु, त्यांनी योग्य वागणूक दिली नाही,” असा दावा काकडे यांनी केला आहे. काही दिवसांपुर्वीच काकडेंनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली आहे. कॉंग्रेस आघाडीची उमेदवारी मिळवण्यासाठी काकडेंनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मुळीक यांच्याशी बोलताना केलेले विधान गांभिर्याने घेतले जात आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवार माढ्यातूनच निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची अधिकृत माहिती!