2002 मध्ये जन्मलेल्या खेळाडूचा व्यावसायिक टेनिसमध्ये पहिला विजय

Laurenzo Musetti.jpg

पुरुषांच्या व्यावसायिक टेनिसमध्ये (professional tennis) दीर्घकाळानंतर नवे आणि तरुण चेहरे चमकू लागले आहेत. नुकत्याच संपलेल्या युएस ओपन टेनिस स्पर्धेत डोमिनिक थिम (Dominic Thiem) , ऍलेक्झांडर झ्वेरेव्ह, दानिल मेद्वेदेव, आंद्रे रुबलेव्ह, पाब्लो बस्टा यांच्या यशाने हे दाखवून दिले आहे. यंग ब्रिगेडची ही चमकदार कामगिरी युएस ओपननंतरही सुरु आहे आणि आता इटलीच्या लॉरेन्झो मुसेट्टी (Laurenzo Musetti) याने लक्ष वेधून घेतले आहे.

मेसुट्टी हा फक्त 18 वर्षांचा असून त्याने त्याच्यापेक्षा जवळपास दुप्पट वयाच्या आणि तीन वेळच्या ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेत्या स्टॕन वावरिंकाला (Stan Wavrinka) पराभवाचा धक्का दिला आहे. रोम येथील डीइटालिया एटीपी स्पर्धेत त्याने 6-0, 7-6 (2) असा विजय मिळवला आणि पहिल्याच फेरीत वावरिंकाचे आव्हान एक तास 24 मिनिटातच संपवले.

या विजयाचे महत्त्व हे की 2002 मध्ये जन्मलेल्या खेळाडूचा एटीपी स्पर्धांमध्ये हा पहिलाच विजय होता आणि रोम येथील या स्पर्धेत सहभागी खेळाडूंमध्ये वावरिंका सर्वाधिक वयाचा तर मुसेट्टी सर्वात कमी वयाचा खेळाडू होता. एवढेच नाही तर मुसेट्टीने एटीपी स्पर्धेत जिंकलेला हा पहिलाच सामना होता. याआधी या दर्जाचा तो फक्त एकच सामना खेळलेला होता. जागतिक क्रमवारीत वावरिंका 17 व्या तर मुसेट्टी 249 व्या स्थानी आहे.

वावरिंकाबद्दल मुसेट्टी म्हणाला की, मी त्याला खेळताना टीव्हीवर बघितले आहे आणि तो खूप चांगला खेळाडू आहे हे मला माहित होते. मुसेट्टीचा पुढचा सामना आता आणखी एक अनुभवी खेळाडू, जपानच्या केई निशीकोरीशी होणार आहे. या सामन्याबद्दल तो म्हणतो की, आधी मला या विजयाच्या आनंद घेऊ द्या, या सामन्याचा विचार नंतर करु या.

मुसेट्टीच्या खेळात सहज फोरहँड आणि देखणा वन हँडेड बॕकहँड दिसून आला. इटालियन खेळाडू सहसा दोन्ही हातांनी बॕकहँड मारतात पण हा तरूण एकाच हाताने बॕकहँड मारताना दिसला. या सामन्याचे समालोचन करणारा माजी नंबर वन जिम कुरियर म्हणाला की, ह्या मुलाचा बॕकहँड कमाल आहे.

मुसेट्टी व वावरिंकाच्या वयातील फरक एवढा आहे की, 2002 मध्ये मुसेट्टी जन्मला त्यावर्षी वावरिंकाने व्यावसायिक टेनिस खेळायची सुरुवात केलेली होती. मुसेट्टी हा ज्युनियर गटात नंबर वन होता आणि त्याने 2019 च्या आॕस्ट्रेलियन ओपनचे मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER