राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात राज्यात २० हजार छोट्या सभा घेणार – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil - Maharastra Today
Chandrakant Patil - Maharastra Today

मुंबई :- महाआघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात राज्यात २० हजार छोट्या सभा घेणार असल्याची मोठी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. या सभांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार. तसेच या सभांमध्ये कोरोनाचा धोका होऊ नये म्हणून सर्व निर्बंध पाळून अभियान राबवण्यात येईल, असंही त्यांनी नमूद केलं. भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. अतिवृष्टी, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने कुठलीही मदत न देता वाऱ्यावर सोडले. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढीव वीज बिलांमुळे सामान्य माणूस चिंताग्रस्त झाला आहे, या व अशा अनेक मुद्द्यांबाबत जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या अभियानात पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील २० हजार शक्तिकेंद्रांच्या माध्यमातून २० हजार छोट्या सभा, बैठका घेण्यात येतील. कोरोनामुळे आलेले सर्व निर्बंध पाळून हे अभियान राबविले जाईल.

महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) कार्यकाळात गुन्हेगारांना बिनदिक्कत संरक्षण दिले जात आहे. तरुणीवर बलात्कार, तरुणींचे संशयास्पद मृत्यू यासारख्या गुन्ह्यांमध्ये राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांची नावे उघडपणे घेतली जात आहेत. या मंत्र्यांना वाचवण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी भाजपने आंदोलन केल्यावरच संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला गेला. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबतही राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे, असे आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलेत.

कॉन्स्टेबलला मारहाण असो, कुणाचा जावई ड्रग्ज कनेक्शमध्ये अडकत आहे, कुणाचं नाव दिशा सालियन बलात्कार आणि हत्याप्रकरणात आलं, कुणाला पूजा चव्हाण (Pooja Chavan) प्रकरणात राजीनामा द्यावा लागला तर कुणाला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुले होतात, ही यादी खूप मोठी आहे. महाराष्ट्रात असं सर्व सुरू आहे. कोणता ना कोणता गुन्हा मंत्र्याशी जोडला गेला आहे आणि या मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मंत्र्यांना प्रोटेक्शन देण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय नेतेच काहीही करतात तर आपण केलं तर काय बिघडलं अशी जनतेची मानसिकता होत आहे, असं ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे राजकारण समाजकारणाचं माध्यम आहे. कायदे करण्याचं माध्यम आहे. पण इथे या, गुन्हे करा आणि राजकीय नेते असल्याने तुम्ही अशा प्रकरणातून बाहेर पडू शकता. तुमचं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही, असं सगळं सध्या राज्यात सुरू आहे. राज्यात हम करे सो कायदा सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

ही बातमी पण वाचा : राज्यात राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू;  चंद्रकांत पाटलांची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER