श्रीनगरमध्ये एके-47 ने अतिरेक्यांकडून गोळीबार, दोन पोलीस शहीद

Baghat Barzulla - Terrorist

श्रीनगर :- जम्मू आणि कश्मीर (Jammu And Kashmir) स्थित श्रीनगरमध्ये (Srinagar) भर दिवसा दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. श्रीनगरच्या बाराजुल्ला परिसरातील बाजारात एके-47 सह बिनधास्तपणे संचार करणाऱ्या अतिरिक्यांनी पोलीस पथकावर अंधाधुंद गोळीबार केला. अचानक बेछुटपणे सुरू केलेल्या या गोळीबारात बेसावध असलेले दोन पोलीस शहीद झाले. हे दोन्ही पोलीस जम्मू-काश्मीर पोलीस दलातील आहे. या चकमकीनंतर पोलीस आणि सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेराव घातला असून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

कॉन्स्टेबल सुहैल अहमद आणि मोहम्मद युसूफ असं शहीद झालेल्या या दोन पोलीस शिपायांचं नाव आहे. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एक अतिरेकी मार्केटमध्ये दाखल झाला आणि एका दुकानाच्या बाहेर उभं राहून त्याने दोन पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली. प्रत्यक्षदर्शींच्या मते दोन अतिरेक्यांनी पोलिसांवर हल्ला केला. फायरिंग केल्यानंतर हे दोन्ही अतिरेकी घटनास्थळावरून तात्काळ फरार झाले. दरम्यान पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टीआरएफ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

या हल्ल्याची माहिती मिळताच जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. शहीद झालेले पोलीस हे श्रीनगर एअरपोर्ट ते श्रीनगर शहर रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर तैनात होते. बाजूलाच बगात बाराजुल्ला पोलीस चौकीही आहे. सुरक्षा रक्षकांच्या म्हणण्यानुसार हे अतिरेकी कोणत्या तरी गल्लीतून आले आणि गोळीबार करून फरार झाले.

लष्कर-ए- तोयबाच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा

दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शोपियांमध्ये रात्री उशिरा दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. ही चकमक आज सकाळपर्यंत सुरू होती. या चकमकीत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं. यावेळी सुरक्षा दलाने अतिरेक्यांकडी मोठ्या प्रमाणावरील शस्त्रसाठा जप्त केला. या चकमकीनंतर आता संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. शोपियांमध्ये काही अतिरेकी लपल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत मिळून संयुक्त कारवाई केली. शोपियांमध्ये चकमक सुरू असतानाच बडगाममध्येही सुरक्षा दल, पोलीस आणि अतिरेक्यांमध्ये जोरदरा चकमक झाली. यावेळी जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एसपीओ अल्ताफ अहमद हे शहीद झाले. या चकमकीनंतर संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER