उत्पन्न वाढवा अभियान : सर्वोत्कृष्ट आगारांसाठी दोन लाख बक्षीस- अनिल परब

Anil Parab

मुंबई : एसटी महामंडळाची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, प्रवाशांना कार्यक्षम, तत्पर प्रवाससेवा उपलब्ध व्हावी याकरिता महामंडळाच्या स्तरावरून सर्वंकष कार्यवाही करण्यात येत आहे . त्याच अनुषंगाने महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या उत्पन्न वाढवा विशेष अभियानांतर्गत एका महिन्यात (मागील वर्षाच्या तुलनेत) सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या आगारांना दरमहा रुपये दोन लाख इतके रोख बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केली आहे. तसेच या अभियाना अंतर्गत जी आगारे निकृष्ट कामगिरी करतील, त्या आगारांतील जबाबदार अधिकाऱ्यांना शिक्षेचे प्रयोजनदेखील ठेवण्यात आले आहे.

हे अभियान १ मार्च ते ३० एप्रिल २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी राबवण्यात येणार आहे. एसटीचे प्रवासी उत्पन्न वाढावे यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री ॲड. अनिल परब यांनी आपल्या पहिल्याच बैठकीमध्ये दिले होते . त्यानुसार महामंडळाच्या वाहतूक विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता देत असताना ॲड. परब यांनी स्पर्धेच्या माध्यमातून उत्पादकता वाढवण्याची गरज विशद केली होती. त्यानुसार एसटीच्या २५० आगारांची (डेपो) प्रदेशनिहाय विभागणी करून प्रत्येक प्रदेशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करून उत्पन्नामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या आगारात दरमहा रुपये दोन लाख, द्वितीय आगारास रुपये दीड लाख व तृतीय आगारास रुपये एक लाख, अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

याबरोबरच महामंडळाच्या ३१ विभागांपैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांनादेखील आगाराप्रमाणे प्रथम क्रमांक दोन लाख, द्वितीय क्रमांकास दीड लाख व तृतीय क्रमांकास सव्वा लाख अशी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. अर्थात हे अभियान प्रयोगिक तत्त्वावर १ मार्च ते ३० एप्रिल २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या स्पर्धात्मक अभियानांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारांना जसे बक्षीस देण्यात येणार आहे तसेच निकृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारातील संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना शिक्षादेखील करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार निकृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारातील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल राखून ठेवणे, त्यांची गैरसोयीच्या ठिकाणी बदली करणे अथवा कारवाई करणे असे या शिक्षेचे स्वरूप असणार आहे. त्यामुळे केवळ बक्षिसासाठीच नव्हे तर शिक्षेपासून बचावण्यासाठीदेखील सर्व २५० आगारांनी आपली कार्यक्षमता वाढवावी हा हेतू आहे .