लोअरपरळ येथे डंपरने तिघांना उडवले; २ ठार

2-killed-1-injured-in-dumper-accident-at-mumbai

मुंबई : लोअरपरळ येथे बावला मस्जिद समोर सोमवारी रात्री भरधाव वेगाने आलेल्या डंपरने तिघांना उडवले. दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी जमाव पांगवला.

लोअरपरळ येथे ना. म. जोशी मार्गावरील बावला मशीदजवळील मोनोरेल स्टेशनच्या पुलाखाली सोमवारी रात्री ११.३० वाजता हा अपघात घडला. डंपरचालक दारुच्या नशेत होता. भरधाव वेगाने पुलाखालून जात असताना त्याचे डंपरवरील नियंत्रण सुटले. त्याने गाड्यांना ठोकले. एका टॅक्सीचे नुकसान झाले असून एका कार चक्काचूर झाली आहे.

अपघातानंतर डंपरचालकाने पळून जाण्याचा प्रयत्नात रस्त्यावरून चालणाऱ्या तिघांना चिरडले. दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एका जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला नायर रुग्णालयात दाखळ करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघातात ठार झालेल्यातील एक – कल्याण येथे राहणारे संजय सखाराम पवार (वय ५९) आहेत. दुसऱ्याची ओळख अद्याप पटली नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

पोलिसांनी डंपरचालकाला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.