गडचिरोलीतील इंद्रावती नदीमध्ये बुडाली बोट, काही लोक बुडाल्याची शक्यता

Indravati River

गडचिरोली : गडचिरली जिल्ह्यातील इंद्रवती नदीमध्ये (indravati-river) नाव बुडाल्यानं एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत या दुर्घटनेतून १३ जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलं आहे तर काही जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती पुढे येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिरोंचा तालुक्यात सोमनपल्ली भागातून छत्तीसगड इथे एका कार्यक्रमासाठी दोन नाव घेऊन काही जण निघाले होते. या दोन्ही नाव संध्याकाळी ७ च्या सुमारास छत्तीसगड इथला कार्यक्रम आटपून पुन्हा परत येत असताना मंगळवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली आहे. सुरुवातीला दोन जण सुखरूप नदीतून बाहेर आले आणि याची माहिती स्थानिकांना आणि पोलिसांना दिली. त्यानंतर गावकरी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. या दुर्घटनेतून आतापर्यंत १३ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळालं आहे तर आणखीन तीन नागरिक बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. वन विभाग, ग्रामस्थ आणि पोलिसांकडून बेपत्ता असणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

नेमकी नाव कशामुळे उलटली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. नाव उलटल्यानंतर सुरुवाती दोन जण सुरक्षित बाहेर पडले तर तीन जण नदीमध्ये असलेल्या दगडाला घट्ट धरून बचावासाठी ओरडत होते. रात्री उशिरा वन विभागाच्या टीमने बोटीच्या मदतीनं काही जणांना इंद्रावती नदीच्या पाण्यातून बाहेर काढलं आहे. अद्यापही पोलीस आणि वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER