अर्णव गोस्वामींसह तिघांविरुद्ध १९१४ पानांचे आरोपपत्र दाखल अन्वय नाईकना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरण

Bombay HC & Arnab Goswami

अलिबाग : ‘इंडिरियर डिझाझनर’चा व्यवसाय करणारे दादर येथील व्यावसायिक अन्वय नाईक यांना दोन वर्षांपूर्वी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून रायगड पोलिसांनी ‘रिपब्लिक टीव्ही’या वृत्तवाहिनीचे प्रधान संपादक अर्णव गोस्वामी यांच्यासह तीन आरोपींविरुद्ध १९१४ पानांचे आरोपपत्र येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात सादर केले.

या संदर्भात नोंदविलेल्या गुन्ह्याच्या पुढील तपासास व आरोपपत्र दाखल करण्यास स्थगिती द्यावी, यासाठी गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. परंतु त्यावर सुनावणी  व्हायच्या आधीच हे आरोपपत्र दाखल केले गेले. हा गुन्हाच रद्द करावा यासाठी गोस्वामी यांनी केलेल्या याचिकेवर १० डिसेंबर रोजी सुनावणी व्हायची आहे.

विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर प्रदीप घरत यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्णव गोस्वामी यांच्याखेरीज फिरोज शेख व नितीश सारडा या आरोपींविरुद्ध हे आरोपपत्र सादर केले गेले. त्यात आरोपींवर भादंवि कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), कलम १०९ (गुन्ह्यास साथ देणे) आणि कलम ३४ (संगनमताने गुन्हा करणे) अन्वये खटला चालविण्याची  विनंती करण्यात आली आहे.

अन्वय नाईक यांनी अर्णव गोस्वामी यांच्या वृत्तवाहिनीच्या कार्यालयाचे व स्टुडिओचे अंतर्गत सजावटीचे काम कतेले होते. त्याचे पूर्ण पैसे वेळेवर न मिळाल्याच्या ताणावामुळे त्यांनी आत्महत्या केली, असे अभियोग पक्षाचे म्हणणे आहे. अन्वय नाईक व त्यांची आई कुमुदिनी यांनी दोन वर्षांपूर्वी अलिबागजवळील त्यांच्या मूळ गावातील घरात आत्महत्या केली होती. त्यावेळी अन्वय नाईक यांनी जी कथित ‘स्युईसाईड नोट’ लिहून ठेवली तो अभियोग पक्षाच्या मते आरोपींविरुद्धचा भक्कम पुरावा आहे. त्या लिखाणाचे हस्ताक्षर अन्वय नाईक यांचेच असल्याचा आणि ते लिखाण कोणत्याही दबावाखाली केले नसल्याचा  तज्ज्ञांचा अहवालही आरोपपत्रासोबत न्यायालयात सादर केला गेला आहे.

पोलिसांनी तपासात जबानी घेतलेल्या ६४ व्यक्तींना कोर्टापुढे साक्षीदार म्हणून उभे करण्याचा अभियोग पक्षाचा प्रस्ताव आहे. त्यापैकी सहा साक्षीदारांच्या जबान्या दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अन्वये दंडाधिकार्‍यांसमक्ष नोंदविलेल्या असल्याने त्या खटल्यात ग्राह्य पुरावा ठरू शकतात.

खरे तर हे प्रकरण गेल्या वर्षी ‘ए समरी’ने बंद करण्यात आले होते. परंतु मयत नाईक यांच्या पत्नीने केलेल्या अर्जावर राज्य सरकारने त्याच्या फेरतपासाचा आदेश दिला .त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी रायगड पोलिसांनी गोस्वामी, शेख व सारडा यांना अटक केली. तिघांनाही ११ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीनावर सोडले. आपण सातत्याने राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बातम्या दिल्या. त्याचा राग धरून बंद केलेले हे जुने प्रकरण मुद्दाम सुडाने उकरून काढण्यात आले, असा गोस्वामी यांचा आरोप आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER