
दिल्ली : आज दिल्लीच्या (Delhi) कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती, लाडली योजनेअंतर्गत आर्थिक मदत, विद्यार्थ्यांना साहाय्य आणि दिल्लीच्या शाळांमधील ग्रंथालयांच्या रचनेत सुधारणा या सर्व कामांसाठी निधीची घोषणा करण्यात आली आहे. हे निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आले. केजरीवाल यांनी लाडली योजनेंतर्गत राज्यात मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
लाडली योजने अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना मदत मिळते. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन, विद्यार्थिनींची पटसंख्या वाढावी आणि आर्थिक सुरक्षा मिळावी, या उद्देशाने २००८ साली महिला आणि बालकल्याण विभागाद्वारे ‘लाडली योजना’ सुरू करण्यात आली होती. या बैठकीत विविध योजनांतर्गत एससी/एसटी/ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी ७५.९८ कोटींची तरतूद करण्यात आली. यात पहिली ते बारावीपर्यंतच्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तींचा समावेश आहे.
सर्वसमावेशक आणि सुलभ शिक्षण डोळ्यासमोर ठेवून सरकारने ‘टॅलेंज प्रमोशन स्कीम’ अंतर्गत आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये ग्रंथालयांना उत्तम आणि सुधारणा करण्यासाठी तसेच पुस्तके सुरक्षित ठेवण्यासाठी येणाऱ्या आर्थिक खर्चासाठी ७.२० कोटींची सरकारने तरतूद केली आहे. यात पुस्तके सुरक्षित ठेवण्यासाठी तब्बल ४ हजार २०० स्टीलची कपाटे खरेदी केली जाणार आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला