आम्ही १५ कोटी, पण १०० कोटींना भारी, ‘एआयएमआयएम’ नेत्याचे बेताल वक्तव्य

Pathan

गुलबर्गा : ‘एआयएमआयएम’चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी बेताल वक्तव्य केले आहे.
मुस्लिम समाजाला चिथावणी देणारे हे वक्तव्य पठाण यांनी कर्नाटकमधील गुलबर्गा येथे केले. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात सुरू आंदोलनात वारिस पठाण यांनी हे वक्तव्य केले असून, यावेळी ‘एआयएमआयएम’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी उपस्थित होते, हे विशेष.

यावेळी बोलताना वारिस पठाण म्हणाले, आम्ही केवळ १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी ठरू, हे लक्षात ठेवा! ते आपल्याला म्हणतात की, आम्ही आमच्या बायकांना पुढे केले आहे. आमच्या केवळ सिंहिणी बाहेर पडल्या आहेत, तर यांना घाम फुटला आहे. जरा विचार करा, आपण सर्व एकत्र येत बाहेर पडलो, तर काय होईल?

दरम्यान, या वक्तव्याने वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.

वारिस पठाण हे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे नेते आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते भायखळा मतदारसंघातून उभे होते. या निवडणुकीत त्यांना पराभवाचे तोंड बघावे लागले होते.