१५.३० लाख कोटी : सर्व सरकारी कंपन्यांपेक्षा रिलायन्सची संपत्ती जास्त !

Mukesh Ambani

नवी दिल्ली : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स (Reliance) रोज नवी झेप घेते आहे. देशातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सने आता एक नवा विक्रम केला आहे. भारत सरकारच्या मालकीच्या सर्व कंपन्यांच्या एकूण संपत्तीपेक्षा एकट्या रिलायन्सची संपत्ती जास्त झाली आहे! मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मार्केट कॅपिटल (Reliance Market Capitalisation) अर्थात बाजार भांडवल हे सरकारच्या कंपन्यांपेक्षा अधिक झाले आहे.

जानेवारी २०२० ते आतापर्यंत देशातील सर्वांत व्हॅल्यूबर कंपनी रिलायन्सचे शेअर ५४.६ टक्क्यांनी वाढले आहेत. गुगल, फेसबुक आणि सिल्वर लेक यासारख्या मोठ्या कंपन्यांनी अंबानींच्या जिओ आणि रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक केल्यामुळे कंपनीचे बाजार भांडवल वाढले आहे. देशातील ८३ सार्वजनिक कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल १५.१६ लाख कोटी आहे. त्यात मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे बाजार भांडवल १५.३० लाख कोटी आहे. या वर्षाच्या सुरुवातीला देशातील सर्व कंपन्यांचे मार्केट कॅपिटल रिलायन्सपेक्षा दुप्पट होते.

वर्षाच्या सुरुवातीला सर्व सरकारी कंपन्यांचे बाजार भांडवल १९.३ लाख कोटी होते. त्यात रिलायन्सचे ९.६ लाख कोटी इतके होते. गेल्या सहा महिन्यांत रिलायन्सने इक्विटी कॅपिटलमधून ३३ बिलियन डॉलर रक्कम मिळवली आहे. गेल्या सहा महिन्यांत  रिलायन्सने त्यांच्या गुंतवणूकदारांची रक्कमदेखील दुप्पट केली आहे.

ब्लूमबर्ग डेटानुसार रिलायन्सचे मार्केट कॅपिटल २०७.८ बिलियन डॉलर इतके आहे. जे भारतीय शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या १० टक्के आहे. भारत जगातील १०व्या क्रमांकाचा इक्विटी बाजार आहे. त्याचे ‘व्हॅल्यूएशन’ २.११ ट्रिलियन आहे. सरकारच्या मालिकीची स्टेट बँक ऑफ इंडियाचे मार्केट कॅपिटल १.७९ लाख कोटी आहे. जे रिलायन्सच्या तुलनेत क्षुल्लक आहे. रिलायन्सनंतर टाटा समूहातील टीसीएस कंपनीचा क्रमांक लागतो. त्यांचे मार्केट कॅपिटल ९.३५ लाख कोटी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER