मुजफ्फरनगर दंगल भडकविल्याचा १२ भाजपा नेत्यांवरील खटला मागे

Court Order - BJP - Maharastra Today

मुजफ्फरनगर (उ. प्र.) :  प्रक्षोभक भाषणे करून सन २०१३ मध्ये मुजप्फरनगरमध्ये दंगल भडविल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पार्टीच्या १२ नेत्यांविरुद्ध दाखल झालेला खटला उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारने  मागे घेतला आहे. या दंगलीत ६० व्यक्ती मारण पावल्या होत्या, ५० हजार लोक बेघर झाले होते व त्याखेरीज कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.

सरकारला हा खटला पुढे चालवायचा नाही. त्यामुळे तो मागे घेऊ द्यावा, असा अर्ज योगी आदित्यनाथ सरकारने दीड वर्षांपूर्वी केला होता. आमदार-खासदरांवरील खटल्यासाठीच्या विशेष सत्र न्यायालयाने सरकारचा हा अर्ज मंजूर करून खटला मागे घेण्यास परवानगी दिली.

ज्या १२ आरोपींविरुद्ध हा खटला दाखल केला गेला होता त्यात उत्तर प्रदेशचे एक विद्यमान मंत्री सुरेश राणा, भाजपा आमदार संगीत सोम, भाजपाचे माजी खासदार भरतेन्दू सिंग व विश्व हिंदू परिषदेचे नेत्या साध्वी प्राची इत्यादींचा समावेश होता.

नांगला  मन्दोर महापंचायतीच्या सम्मेलनात केलेल्या प्रक्षोभक भाषणांवरून नंतर जानेवारी २०१३ मध्ये ही दंगल भडकली होती. प्रक्षोभक भाषणे करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, सरकारी अधिकार्‍यांच्या कामात अडथळे आणणे आणि त्यांना डांबून ठेवणे इत्यादी गुन्ह्यांसाठी हा खटला होता. यात राणा, सोम व सिंग यांना अटक झाली होती व त्यांच्याविरुद्द राष्ट्रीय सुरक्षा कायदाही (National Security Act-NSA) लावण्यात आला होता. परंतु नंतर ‘एनएसए’च्या सल्लागार मंडळाने त्यांच्यावरील या कायद्याची कलमे काढून टाकली होती.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button