१०० ऐवजी ११२ !

Emergancy Call

मुंबई : पोलीस मदतीसाठी असणारा १०० ऐवजी आता ११२ हा नवा क्रमांक सेवेत येणार आहे. पोलिसांसह अग्निशमन दल, रुग्णवाहिका यांचीही मदत मिळविण्यास ११२ कंट्रोल रूममधून सहकार्य केले जाणार आहे. राज्यभरात लवकरच ही यंत्रणा सुरू होणार आहे. राज्यभर ११२ या यंत्रणेसाठी चारचाकी वाहने तैनात करण्यात येणार आहेत. या वाहनात एक अधिकारी व चार कर्मचारी असणार आहेत. कंट्रोलला सूचना मिळताच तिथून घटनास्थळापासून जवळ असणाऱ्या वाहनाकडे ती माहिती दिली जाणार आहे. तिथून घटनास्थळी लवकरात लवकर पोहचण्यास मदत मिळणार आहे.

डायल ११२ ही पूर्वीच्या यंत्रणेपेक्षा सतर्क व आधुनिक असणार आहे. राज्यभरात हा क्रमांक कार्यान्वित केला जाणार असून, मुख्य कंट्रोल रूम वरळीमध्ये राहणार आहे. या ठिकाणी कॉलची नोंद होऊन संबंधित जिल्ह्याला तत्काळ सूचना केली जाणार आहे. सध्या १०८ रुग्णवाहिका सेवा ज्या पद्धतीने चालते तशीच ११२ देखील चालविण्यात येणार आहे. ‘एक शून्य शून्य’ याचा पोलीस खात्याशी जवळचा संबंध होता. अनेक पोलिसांनी १०० ने शेवट असणारे मोबाईल क्रमांक घेतले आहेत. सर्वसामान्यांमध्येही या क्रमांकाबाबत अधिक जागृती होती.

घरगुती वाद, गल्लीतील भांडण, हाणामारी यासह कोणत्याही समस्येच्या वेळी १०० वरून दखल घेतली जात होती; पण आता देशपातळीवर ११२ हा एकच क्रमांक करण्याच्या हालचाली सुरू आहेत. उत्तरप्रदेशात चार महिन्यांपासून डायल ११२ उपक्रम कार्यान्वित झाला आहे. वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार आहे. जेणेकरून कंट्रोल रूमला घटनास्थळाच्या जवळ कोणते वाहन आहे हे समजेल. त्यानुसार सूचना मिळताच ते वाहन दाखल होईल. कायदा व सुव्यवस्थेसोबत आगीची घटना, अपघातावेळीही मदत मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER