संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय ; १०१ संरक्षण उत्पादनांची आयात रोखली

Rajnath Singh

मुंबई : संरक्षण मंत्रालयाकडून ‘आत्मनिर्भर भारत’ (AtmanirbharBharat) योजनेसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे . संरक्षण मंत्रालयाकडून १०१ संरक्षण सामुग्रीची एक यादी तयार करण्यात आलीय. या १०१ साहित्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात येणार आहे. या यादीत सामान्य पार्टसशिवाय काही ‘हाय टेक्नॉलॉजी वेपन सिस्टम’ (High Technology weapon System)चाही समावेश आहे.

देशातील उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ बनवण्याच्या आवाहनानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय. यामुळे भारताच्या संरक्षण व्यावसायाला मोठ्या प्रमाणात उत्पादनाची संधी मिळेल, असेही संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे . संरक्षण मंत्रालयाकडून निश्चित करण्यात आलेल्या ‘निगेटिव्ह आर्म्स लिस्ट’ (Negetive Arms List) नुसार या संरक्षण साहित्याच्या आयातीवर बंदी घालण्यात येणार आहे.

संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व स्टेकहोल्डर्सशी चर्चा केल्यानंतर उत्पादनांच्या आणि उपकरणांच्या आयातीवर रोख लावण्यात येणार आहे. सध्या जे निर्णय घेण्यात आलेत ते सर्व २०२० ते २०२४ दरम्यान लागू केले जातील. १०१ उत्पादनांच्या यादीत ‘आर्म्ड फायटिंग व्हेईकल्स’चाही (AFVs) समावेश आहे. मंत्रालयानं २०२०-२१ दरम्यानचं खरेदी बजेट देशी आणि विदेशी मार्गात विभागलाय. सध्याच्या आर्थिक वर्षात जवळपास ५२,००० कोटी रुपयांचे वेगळं बजेट तयार केले जाणार आहेत.

संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून जी यादी तयार करण्यात आलीय ती भारतीय लष्कर, जनता आणि खासगी व्यावसायांशी चर्चा करून तयार करण्यात आलीय. अशा उत्पादनांच्या जवळपास २६० योजनांसाठी तिन्ही सेनांनी एप्रिल २०१५ पासून ऑगस्ट २०२० पर्यंत जवळपास साडे तीन लाख कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्टस दिले आहेत, असंही संरक्षण मंत्र्यांनी म्हटले . अंदाजानुसार, येत्या ६ ते ७ वर्षांत स्थानिक इंडस्ट्रीला जवळपास ४ लाख कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्टस दिले जातील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.