
नवी दिल्ली : अयोध्येत (Ayodhya) उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी (Ram Mandir) श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने राबवलेल्या देणगी मोहिमेच्या माध्यमातून आतापर्यंत १००० कोटी रुपयांचा निधी मिळविलेला आहे, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त श्री विश्वप्रसन्न तीर्थ महाराज यांनी दिली. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना राम मंदिराच्या उभारण्यासाठी करण्यात आली होती. विश्व हिंदू परिषदेच्या मदतीने हे ट्रस्ट काम करत आहे.
ट्रस्टतर्फे १५ जानेवारीपासून देशभरातून देणगी मोहिमेला प्रारंभ केला होता. त्या माध्यमातून अवघ्या दीड महिन्यात १००० कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. “दक्षिण भारतातील जनतेनं या दिलेल्या प्रतिसादामुळे मी खूप आनंदी आहे. निधी गोळा करण्यासाठी मी खूप प्रवास केला. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सढळ हाताने मदत केली आहे. निधीमध्ये वाढ होणं हिंदू समाजासाठी महत्त्वाची बाब आहे. केवळ मंदिर आणि श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना करायची एवढाच उद्देश नाही. तर रामराज्य प्रस्थापित करणं हे या प्रकल्पाचं अंतिम उद्दिष्ट आहे.” असे मत ट्रस्टचे विश्वस्त विश्वप्रसन्न यांनी व्यक्त केले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला