तालिबान्यांकडून १०० लोकांचं अपहरण

100 people abducted by Taliban

काबुल : तालिबानी दहशतवाद्यांनी अफगानिस्तानच्या उत्तरेकडील भागात असणा-या १०० हून अधिक लोकांचे अपहरण केले आहे. अपहृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे. ईद-उल-अजहाच्या काही दिवस आधी राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी शस्त्रसंधीचे आवाहन केले होते. मात्र तरीही तालिबानने या लोकांचं अपहरण करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

सोमवारी तालिबानच्या दहशतवाद्यांनी तीन बस रोखल्या आणि त्यातील प्रवाशांना घेऊन गेले. अशी माहिती कुंदूज प्रांताचे प्रमुख मोहम्मद युसूफ अयुबी यांनी दिली. ही घटना खान आबाद जिल्ह्यात घडली. दहशतवादी झाडांमध्ये दबा धरून बसले होते. संधी मिळताच त्यांनी बसवर हल्ला केला. सरकारी कर्मचारी किंवा सुरक्षा रक्षकांना बंधक बनवण्याचा तालिबानी दहशतवाद्यांचा डाव होता, असेही अयुबी यांनी म्हटले आहे.

ताखार प्रांताचे पोलीस प्रमुख अब्दुल रहमान अकताश म्हणाले की, हे अपहृत बदखशान आणि ताखर प्रांतातील रहिवासी असून हे सर्वजण काबूलला जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान तालिबानने या घटनेची जबाबदारी अद्याप घेतलेली नाही. परंतु, वृत्त संस्थांनुसार या घटनेमागे तालिबानचाच हात असल्याचे सांगण्यात येते.