अजित पवारांनी बारामतीसाठी १०० कोटींचा निधी खेचला

Ajit Pawar

मुंबई : फडणवीस सरकारच्या कार्यकाळात पुरवणी मागण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याची तक्रार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सतत करण्यात येत होती. मात्र आता सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीकडूनदेखील पुरवणी मागण्यांचे वाढलेले प्रमाण कायम ठेवले आहे. पुरवणी मागण्यांतही बारामतीला झुकते माप देण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या बारामती मतदारसंघासाठी १०० कोटींपेक्षा जास्त रकमेची कामे पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मंजूर करून घेतल्या आहेत. यामध्ये बारामतीत सर्प-पक्ष अभयारण्यासाठी पाच कोटी, एसटी आगारासाठी आठ कोटी, पोलिसांच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १५ कोटी, जलतरण तलाव आणि क्रीडा साहित्यासाठी १ कोटी ६२ लाख, भूमिगत विद्युतवाहिनीसाठी ५० कोटी, शासकीय वसतिगृहासाठी १२ कोटी आणि वैद्यकीय महाविद्यालयासाठी ९ कोटी ८० लाख मंजूर करण्यात आले आहेत.

यावरून भाजपने महाविकास आघाडीवर टीका केली आहे. राज्यात इतर शहरे असताना केवळ बारामतीवर कृपा का? असा प्रश्न माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, शेतकरी कर्जमाफीसाठीच्या १५ हजार कोटींसह एकूण २४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर करण्यात आल्या आहेत. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीने सत्तेचा गैरवापर करुन पैसा आणि दहशतीच्या बळावर माळेगाव जिंकले!