गोरेवाडा वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी १० पदांना मंजुरी

Gorewada-Zoo

नागपूर: नागपूर येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयांतर्गत वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी १० पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विज्ञापीठ यांच्या नियंत्रणाखाली वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रासाठी एकूण २० पदांची गरज होती. यापूर्वी १० पदे निर्माण करण्यात आली असून उर्वरित १० पदांना आज मंजुरी देण्यात आली. या मंजूर पदांमध्ये संचालक, उपसंचालक, विषयतज्ज्ञ अशी नियमित स्वरुपातील सहा पदे आहेत, तर तांत्रिक स्वरुपाची उर्वरित चार पदे बाहेरून भरण्यात येणार आहेत.

राज्यातील निरनिराळ्या भागात नोंद झालेल्या आजारी वन्यजीवांवर उपचार करणे, मानवी वस्तीमध्ये शिरकाव केलेल्या वन्यजीवांना बधिरीकरण करुन पकडणे, सुरक्षित स्थळी हलविणे, वन्यजीव प्रजाती ओळख, सहाय्य-प्रजोत्‍पादन, वन्यजीव संवर्धन संशोधन व प्रशिक्षण, आजारी व पकडलेल्या वन्यजिवांचे पुनर्वसन इत्यादी उद्द‍िष्टांचा या केंद्रामध्ये समावेश आहे.