राष्ट्रीय ‘लोकअदालत’मध्ये १० लाख प्रकरणे निकाली

Nalsa

नवी दिल्ली :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने (National Legal Services Authority-NALSA) देशभरात एकाच वेळी आयोजित केलेल्या `राष्ट्रीय लोकअदालत`मध्ये १० लाखांहून अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात ३.२२८ कोटी रुपयांचे प्रलंबित दावे तडजोडीने मिटविण्यात आले. या वर्षातील ही शेवटची `राष्ट्रीय लोकअदालत` होती.

‘नाल्सा’ने त्यांच्या पोर्टलवर उपलब्ध केलेल्या माहितीनुसार ३१ राज्यांच्या विधी सेवा प्राधिकरणांनी या लोकअदलती भरविल्या. त्यात ८,१५२ न्यायपीठांनी न्यायदान केले. निकाली काढल्या गेलेल्या एकूण १० लाख ४२ हजार ८१६ प्रकरणांपैकी ५ लाख ६० हजार ३१० प्रकरणे न्यायालयात दाखल होण्यापूर्वीच मिटविली गेली तर नियमित न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली ४ लाख ८२ हजार ५०६ प्रकरणे तडजोडीने निकाली काढली गेली. निकाली निघालेल्या प्रकरणांमध्ये कामगारांचे वाद, पैसे वसुलीचे वाद, पोटगीचे दावे, चेक न वटल्याचे खटले, दंड आकारणीने मिटण्यासारखी फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वाद (घटस्फोट वगळून), नोकरदारांचे पगार, भत्ते व निवृत्ती लाभांचे वाद व दिवाणी स्वरूपाच्या अन्य प्रकारच्या दाव्यांचा समावेश होता.

ठिकठिकाणच्या या लोकअदालती शक्य होईल तेथे प्रत्यक्ष सुनावणी घेऊन तर इतर ठिकाणी ‘व्हिडीओ सुनावणी’ घेऊन चालविल्या गेल्या. त्यासाठी देशभर ‘व्हिडीओ लिक’ची विशेष व्यवस्था केली गेली होती. ‘व्हिडीओ’ पद्धतीने घेतलेल्या सुनावणींमध्ये तीन लाखांहून अधिक प्रकरणे निकाली काढली गेली, हे लक्षणीय आहे.

या वर्षातील अशाच प्रकारची पहिली `राष्ट्रीय लोकअदालत` ८ फेब्रुवारी रोजी देशभर तालुका ते हायकोर्ट अशा सर्व पातळींवर भरविली गेली होती. त्यात ११.९ लाख प्रकरणे निकाली निघाली होती. त्यापैकी ६.७ लाख न्यायालयांत दाखल न झालेली तर ५.२ लाख  नियमित न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली होती.

ही बातमी पण वाचा : न्यायाधीशांनीही टिका अधिक मोकळेपणाने स्वीकारायला हवी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER