राष्ट्रवादीत इनकमिंग : सांगली बाजार समितीच्या सभापतीसह १० संचालकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

NCP

सांगली : राज्यात सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे. पक्ष सोडून गेलेले नेते घरवापसी करताना दिसून येत आहे. तर इतर पक्षातील नेतेसुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिसत आहे. त्यातच आता सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Sangli Market Committee) सभापतीसह १० संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला. जयंत पाटील यांनी बाजार समितीवरील प्रशासक हटवून पुन्हा सत्ता दिल्याने उतराई म्हणून सभापती व संचालकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सभापतीसह संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी जाहीर प्रवेश केला. काँग्रेसचे माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम, माजी मंत्री दिवंगत मदन भाऊ पाटील, काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील, काँग्रेस आमदार विक्रम सावंत तसेच भाजपचे नेते अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीमध्ये विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती. सर्व संचालक मंडळ काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीमध्ये कार्यरत होते. या संचालक मंडळाचा कार्यकाळ नुकताच गेल्या महिन्यात संपला होता. त्यानंतर बाजार समितीवर राज्य शासनानाकडून प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर यातील काही संचालकांनी न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, याबाबतचा निर्णय हा राज्य शासन आणि पणन खात्याच्या अंतर्गत येऊन ठेपला होता. तर खात्याची प्रभारी जबाबदारी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे होती. त्यामुळे संचालक मंडळाने जयंत पाटील यांना कार्यकाळ वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर जयंत पाटील यांनी पणन खात्याच्या माध्यमातून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियुक्त करण्यात आलेला प्रशासक हटवत विद्यमान संचालक मंडळांना मुदतवाढ दिली. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभापती दिनकर पाटील यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १० संचालकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान सभापती दिनकर पाटील आणि मार्केट कमिटीमध्ये काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या या सर्व मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश म्हणजे जयंत पाटील यांनी केलेल्या मदतीची परतफेड असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER