एटीएममधून 1 कोटी 61 लाख रुपये लंपास

मुंबई : बँकेच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरुन झाल्यानंतर एटीएम मशीन मेन्टेनन्सच्या कॉलच्या वेळेत ओटीसी पासवर्डचा गैरवापर करुन एका कर्मचार्‍याने 17 एटीएम मशीनमधून 1 कोटी 61 लाख रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन वांद्रे पोलीस तपास करत आहेत.

मुंबईतील विविध बँकांकडून रोख रक्कम गोळा करुन ती बँकांच्या एटीएम मशीनमध्ये जमा करण्याचे काम एका नामांकीत कंपनीत कंपनीकडून करण्यात येत आहे. कुलाबा ते विरार या दरम्यान सरकारी तसेच, खाजगी बँकांच्या एटीएम मशीनमध्ये रोख रक्कम भरण्यासाठी जी-1 ते जी-16 असे मार्ग तयार करण्यात आले आहेत. ही रोख रक्कम भरल्यानंतर त्याचे दर महिन्याला लेखापरीक्षण करण्यासाठी कंपनीने पाच लेखापालांची नेमणूकसूद्धा केली आहे.

कंपनीमध्ये आरएक्स सिक्युरीटी मॅनेजर पदावर काम करत असलेल्या नलावडे यांना 25 नोव्हेंबरला कंपनीच्या एका लेखापालाचा कॉल आला. त्याने वांद्रे पश्‍चिम येथील बँक ऑफ ईंडियाच्या एका मशीनमध्ये 90 हजार आणि दुसर्‍या मशीनमध्ये 6 लाख 7 हजार 500 रुपये कमी असल्याचे सांगितले. हे ऐकून नलावडे यांनी आणखी एका लेखापालाला सोबत घेत एटीएम सेंटर गाठले.

नलावडे यांनी कंपनीच्या या मार्गावरील सर्व एटीएम मशीन तपासण्याचा निर्णय घेतला. दुपारी तीनच्या सुमारास सुरु केलेले हे काम दुसर्‍या दिवशी दुपारी संपले. एकूण 17 एटीएम मशीन्स तपासण्यात आल्या होत्या. त्यात तब्बल 1 कोटी 61 लाख 68 हजार 500 रुपये कमी असल्याचे निर्दशनास आले. नलावडे यांनी तिन लेखापालांसह कस्टोडीयन प्रदीप याला घेऊन कंपनीचे कार्यलय गाठले.

कंपनीच्या वरीष्ठांनी केलेल्या चौकशीत प्रदीप याने गुन्ह्याची कबुली देत बँकेच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरुन झाल्यानंतर एटीएम मशीन मेन्टेनन्सच्या कॉलच्या वेळेत ओटीसी पासवर्डचा गैरवापर करुन पैसे काढल्याचे सांगितले. तसेच त्याने ही रक्कम एका मित्राच्या मदतीने गुंतवल्याचीही माहिती दिली. अखेर नलावडे यांनी वांद्रे पोलीस ठाणे गाठून याबाबत लेखी तक्रार दिली.