बुध्दिबळासाठी सरकारी निधीत दीड कोटींची वाढ

अर्थसहाय्य चार कोटींवरुन साडे पाच कोटी

chees game

क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळांना प्रायोजक व निधीची कमतरता नसते पण बुध्दिबळाबाबत असे नाही. बुध्दिबळात पैसे गुंतवणे हा अजुनही कितीतरी उद्योगांना फायद्याचा सौदा वाटत नाही. बुध्दिबळाच्या जगात ६४ ग्रँडमास्टर्स असणाºया भारताचे येत्या काही वर्षात वर्चस्व राहण्याचा दिग्गजांचा अंदाज असला तरी उद्योगसमुहांच्या या विचारसरणीत फरक पडलेला नाही. त्यामुळे भारत सरकारने बुध्दिबळासाठीच्या अनुदानात दीड कोटींची वाढ केली असल्याची माहिती ‘चेसबेस’ या संकेत स्थळाने दिली आहे.

त्यामुळे याआधी मिळणारा ४ कोटींचा निधी वाढून आता साडे पाच कोटी मिळणार आहे. युवा खेळाडूंचा विकास आणि आघाडीच्या खेळाडूंच्या प्रगतीसाठी हा निधी वापरता येणार आहे.

अलीकडेच अबुधाबी मास्टर्स स्पर्धेसाठी ३७ खेळाडू भारत सरकारच्या अर्थसहाय्याने सहभागी झाले होते. त्यापैकी चौघांनी चांगली कामगिरी करत नॉर्म प्राप्त केले आहेत. अ.भा.बुध्दिबळ महासंघाने ही स्पर्धा खेळाडूंना अनुभव मिळण्यासाठी (एक्सपोझर ट्रीप) निश्चित केली होती. त्यामुळे अबुधाबी मास्टर्समध्ये सहभागी १५१ स्पर्धकांपैकी ७६ भारतीय होते.

एक्सपोझर ट्रीपमध्ये राष्टÑीय अजिंक्यपद, राष्टÑीय ज्युनियर व सब ज्युनियर स्पर्धांतील यशस्वी खेळाडूंचा सहभागाचा पूर्ण खर्च भारत सरकार करत असते. अबुधाबीसाठी राष्टÑीय अजिंक्यपद स्पर्धेतून सहा पुरूष व सहा महिला खेळाडूंचा भार सरकारने सोसला होता. १० सब ज्युनियर व १२ ज्युनियर खेळाडूसुद्धा सरकारी खर्चाने या स्पर्धेत सहभागी झाले होते.

अबु धाबीच्या या स्पर्धेत पी.व्ही.नंदिधा हिने महिला ग्रँडमास्टरचा मान मिळवला तर महालक्ष्मी, नितीश बेलूरकर, अरण्यक घोष यांनी इंटरनॅशनल मास्टरचा नॉर्म मिळवला.

याशिवाय सरकारी निधीतून आघाडीचे २४ ज्युनियर (१२ मुले व १२ मुली) आणि २४ सप ज्युनियर (१२ मुले व १२ मुली) यांच्यासाठी नामवंत प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. राष्टÑीय स्पर्धेतील आघाडीच्या सहा महिला खेळाडू आणि जुुलैअखेरच्या मानांकन यादीतील पहिल्या सहा महिला खेळाडूंसाठीही प्रशिक्षण शिबिर घेतले जाणार आहे.

याशिवाय जागतिक सांघिक स्पर्धेत सहभाग, जागतिक युवा, जागतिक कॅडेट आणि जागतिक ज्युनियर स्पर्धांमधील सहभाग, आशियाई युवा आणि आशियाई ज्युनियर स्पर्धेतील सहभाग, आशियाई सांघिक आणि आॅलिम्पियाड स्पर्धेतील सहभाग, विश्वचषक २०१९ मधील सहभाग आणि वर्षाला दोन एक्सपोजर ट्रीप सरकारी प्रायोजकत्वाने होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.