राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मते हवी असल्याने भाजपा सेनेला दूर करणार नाही ; शरद पवार

मुंबई : शिवसेनेच्या सततच्या त्रासाला कंटाळलेला भाजप आपल्या मित्रमक्षाला दूर करण्याचा विचार करत असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र वेगळेच मत मांडले आहे. पवार म्हणतात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिवसेनेला सोडणार नाही, कारण भाजपाला शिवसेनेची मते हवी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पदाधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते.

पवार म्हणाले, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपला १०-२० हजार मते कमी पडत आहेत. हे पाहता त्यांना या घटकेला शिवसेनेच्या मतांची आवश्यकता आहे. शिवसेनेचे १८ खासदार असल्याने त्यांना महत्त्व येते. त्यामुळे हे अंतर दोघेही वाढू देणार नाहीत. संसार चालतो तो भांड्याला भांडे घासतातच.

राज्यातील मध्यावधी निवडणुकीच्या चर्चा केवळ अफवा आहेत. मात्र, २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची शक्यता वाटते. याआधी लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या होत्या. यासाठी खर्चही कमी येतो. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसची तशी तयारी असली पाहिजे, असे पवार म्हणाले.

लोकसभेबरोबरच सर्वच राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याविषयी वरिष्ठ पातळीवर चर्चा आहे. सततच्या निवडणुकांमुळे प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम होतो. कोणत्याही राज्यात निवडणूक असली की केंद्रात निर्णय घेता येत नाहीत. याविषयी मनमोहनसिंग यांनी चर्चा केली आणि आताही ते करत आहेत. याबाबत पुन्हा चर्चा होईल. याबाबत काही अडचणी आहेत, पण त्या दूर करता येतील का, हे चर्चेतील मुख्य मुद्दे आहेत, याकडे पवारांनी लक्ष वेधले.

अल्पसंख्याकांनी भाजपला मते दिली ही तर १०० टक्के खोटी गोष्ट असल्याचे सांगून पवार म्हणाले, अल्पसंख्याकांनी मते दिली हा त्यांच्या प्रचाराचा भाग असून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार आहे, असे पवारांनी सांगितले. अल्पसंख्याकांची भाजपला मते नाहीत अलीकडे देशात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला सर्व राज्यांमध्ये यश मिळाले नव्हते. उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये बहुमत मिळालेल्या भाजपला पंजाब, मणिपूर, गोव्यात काँग्रेससह इतर पक्षांनी रोखले. पण सत्तेचा वापर करून त्यांनी मणिपूर, गोव्यात सरशी साधली. यामुळे सर्वत्र भाजप असा निष्कर्ष काढता येणार नाही.

राहुल हे काँग्रेसचा मुख्य चेहरा असणे याविषयी पवारांनी सुरुवातीपासूनच नापसंती व्यक्त केली होती. त्याविषयी त्यांनी पुन्हा एकदा आपले मत व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा दोन्ही व्यक्तीच्या चेहऱ्यांकडे पाहून मते दिली गेली. अशा दोन व्यक्ती असतील तर लोक आपले मत कोणाच्या पारड्यात टाकतील हे मी सांगण्याची गरज नाही, असे सांगून पवारांनी राहुल गांधींवर आडून टीका करण्याची संधी सोडली नाही.