२०१९ नंतर देशाचे पंतप्रधान शरद पवारच?

Sharad Pawar

विजय गावंडे

नागपूर : देशाच्या पंतप्रधानपदासाठी चालून आलेली संधी पक्षाच्याच काही वरिष्ठ नेत्यांमुळे हुकल्याचे दुःख माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्तमान अध्यक्ष शरद पवार पचवू न शकल्याने त्यांनी काँग्रेस पक्षामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एके दिवशी आपल्या पक्षाची ताकद मजबूत करून आपण देशाचे पंतप्रधान होणार असल्याचे दिव्यस्वप्न पाहणारे शरद पवार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतरदेशाचे पंतप्रधान होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्याच्या दृष्टीने पवार यांनी मोदी विरोधात असलेल्या समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. तिसरी आघाडी निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांनी इतर पक्षाच्या नेत्यांशी जवळीक साधण्याचा खटाटोप सुरु केला. कधी चर्चा, कधी भेट, तर कधी स्नेहभोजनाला जाणे सुरु केले.

“जीधर दम उधर हम” ची भूमिका घेणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी पवार यांनी थोडी जास्तीच जवळीक साधली आहे. तिसरी आघाडी निर्माण केल्यानंतर त्याच नेतृत्व कोणी करावे यावरही मतभेद निर्माण झाले. कारण काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मते देशाचे भावी पंतप्रधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व्हावे असे आहे. तर “जीधर दम उधर हम” ची भूमिका घेणाऱ्या ममता बॅनर्जी यांनाही भावी पंतप्रधानपदाचे डोहाळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शरद पवारांना आपले स्वप्न पूर्ण होणार का? असा प्रश्न पडला.

आता आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शरद पवारांनी तिसऱ्या आघाडीला समर्थन नसल्याचे जाहीर करत तशी माहिती ममतांना कळविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेतून बेदखल करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येत तिसरी आघाडी करू नये, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांना सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे.

तसेच तिसऱ्या आघाडीमुळे समस्या अधिकच वाढतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. मोदीविरोधी पक्षांनी आपापल्या राज्यात स्वत:चे अस्तित्व अधिक मजबूत करावेत आणि जिथे भाजपाला पराभूत करणे शक्य आहे, तिथे तेथील स्थितीप्रमाणे जागावाटप करावे, असा सल्ला त्यांनी इतर [पक्षांना दिला आहे. जाणकारांच्या मते तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व आपल्याकडे यावे यासाठी शरद पवारांनी तिसऱ्या आघाडीला दिलेले समर्थन मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय सद्यपरिस्थितीत माझ्याशिवाय नरेंद्र मोदींना पराभूत करण्याची ताकद इतर कुठल्याही नेत्यात नाही, हे पवारांना चांगलेच ज्ञात आहे.

आघाडी निर्माण झाल्यास त्याचे नेतृत्व माझ्याकडे कसे आणता येईल याची रणनीती आखत आघाडीला समर्थन न देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मी घेतलेल्या निर्णयामुळे समविचारी पक्षाजवळ आपल्याला नेतृत्व देण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही याची जाणीव शरद पवारांना आहे. आणि नेतृत्व करणाऱ्याला पंतप्रधानपद देण्यात येईल हे पण पवारांना कळून चुकले आहे. त्यामुळे शरद पवारांकडे तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व मिळाले तर ते २०१९ नंतर देशाचे पंतप्रधान होतील यात काही शंकाच नाही

(वरील बातमी एप्रिल फूल असून २०१९ नंतर खरोखर शरद पवार पंतप्रधान झाले तर तो योगायोग समजावा)