सोलापुरात महावितरणची ३५ कोटी रुपये बाकी येणे

१.४२ लाख ग्राहकांकडून वसुलीसाठी धडक मोहीम

सोलापूर जिल्ह्य़ात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील एक लाख ४२ हजार १५९ वीजग्राहकांकडे वीजबिलाची ३४ कोटी ८० लाखांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम हाती घेतली आहे. यात बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार असून, त्यासाठी कार्यकारी अभियंत्यांपासून ते जनमित्रांपर्यंत सर्वाना वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

महावितरणच्या सोलापूर मंडळात सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीणसह अकलूज, पंढरपूर व बार्शी या पाच उपविभागांत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीज वापरासाठीची थकबाकी ३५ कोटींच्या घरात गेली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी सोलापूर मंडळाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ज्या वीजग्राहकांकडे थकबाकी आहे त्यांना थकबाकी भरण्याबाबत नोटिसा बजावण्यात येत आहेत. जिल्ह्य़ात एक लाख रुपयांपेक्षा जास्त वीज बिल थकबाकी असलेले १०७ वीजग्राहक आहेत. त्यांच्याकडे दोन कोटी ७० लाखांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित उपविभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.

५० हजारांपेक्षा जास्त वीजबिल थकबाकी असलेले २११ ग्राहक असून, त्यांच्याकडे एक कोटी ४१ लाखांची थकबाकी आहे. त्यांच्याकडील वसुली करण्याची जबाबदारी संबंधित उपविभागीय अभियंत्याकडे सोपविण्यात आली आहे. ५ हजार ते ५० हजारांपर्यंत वीजबिल थकबाकी असलेले ११ हजार ४ वीजग्राहक आहेत. त्यांच्याकडे ११ कोटी ३७ लाखांची थकबाकी आहे. त्याची वसुली करण्याची जबाबदारी शाखा अभियंत्यांकडे देण्यात आली आहे. पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंत वीजबिल थकबाकी असलेल्या ग्राहकांची संख्या एक लाख ३० हजार ८३७ इतकी आहे. त्यांच्याकडील थकबाकीची रक्कम १९ कोटी ३० लाख रुपये आहे. ही वसुली संबंधित जनमित्रांकडे सोपविण्यात आली आहे. महावितरणचे सोलापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता धनंजय औंढकर हे या वसुली मोहिमेचा आढावा घेत आहेत.

जनमित्र, शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता व संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता अशी महावितरणची संपूर्ण यंत्रणाच या मोहिमेत सहभागी झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपली वीजबिल थकबाकी तातडीने भरून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन अधीक्षक अभियंता औंढकर यांनी केले आहे.