सॅनिटरी नॅपकीन जीएसटी मुक्त करण्यात यावे : सुप्रिया सुळे

मुंबई : मोदी सरकारने स्वच्छ भारत अभियान सुरु केले. मात्र, देशात महिलांच्या आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने महत्वाचा असलेला सॅनिटरी नॅपकीन जीएसटी मुक्त होत नाही.

यावरून सरकारचा खोटारडेपणा स्पष्टपणे दिसून येतो, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. जीएसटीमुक्त सॅनिटरी नॅपकीन हा आपला मुलभूत हक्क आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सॅनिटरी नॅपकीनवर लावलेला जीएसटी रद्द करावा, या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-माझगाव येथील सेल्स टॅक्स कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी स्पेशल कमिशनर पराग जैन यांना निवेदन देवून सॅनिटरी नॅपकीनवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी विशेष असतो. मात्र, या कालावधीतही मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला स्वत:च्या आरोग्यासाठी न्याय मागत आहे, ही महत्वाची बाब असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सॅनिटरी पॅडवरील जीएसटी रद्द करण्यात यावा, यासाठी सातत्याने अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासोबत पत्रव्यवहार सुरू आहे. महिला सबलीकरणाच्या सर्व महत्वाच्या निर्णयात महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. जीएसटी मुक्त सॅनिटरी नॅपकीनसाठी आपण लढा देवू. हा फक्त महिलांचा प्रश्न नाही. विषेश म्हणजे, आपल्या या लढ्यात केवळ महिलांचाच समावेश नसून, संघटनेतले सर्व पुरूषही उपस्थित आहेत हेच समानतेचं लक्षण आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.