शिवसेनेला संपविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न – रामदास कदम

सोलापूर : राज्य आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील जनतेमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होत असतांना सत्तापक्षात घटकपक्ष म्हणून असलेल्या शिवसेनेची वाढती लोकप्रियता बघून भाजप भयभीत झाली आहे.

शिवसेनेची ताकद कुमकुवत करण्यासाठी केंद्र सरकार मोठे प्रयत्न करीत असून त्याचाच एक भाग म्हणजे केंद्रात १९ खासदार असतानाही सेनेला एकच मंत्रिपद देण्यात आले. असा सनसनाटी आरोप राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला. सोलापूर येथे कार्यक्रमासाठी आले असता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा करतांना त्यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

यावेळी बोलताना कदम म्हणाले की, शिवसेनेच्या सहकार्यामुळेच भाजपा राज्यात मोठी झाली. आज तीच भाजपा सेनेलाकुमकुवत कसे करता येईल यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाचार असल्याची टीकाही त्यांनी केली. नोटबंदी, जीएसटी यासारख्या निर्णयांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा मनात मोदींबाबत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंतप्रधान मोदींवर टीका करताना ते म्हणाले, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पाकिस्तानला चांगला धडा शिकवतील असे वाटले होते. मात्र मोदी हे लाहोरमध्ये जाऊन नवाज शरीफच्या वाढदिवसाचे केक कापत राहिले आणि दुसरीकडे पाकिस्तानी सैनिक सीमेवर भारतीय सैनिकांच्या माना कापत राहिले. मोदी यांना याची शरम वाटायला हवी होती.

भाजप नेहमीच शिवसेनेला संपवण्याचे कट रचत आले आहे. युतीमध्ये शिवसैनिकांनी भाजपाचा उमेदवार निवडून यावा, याकरिता कष्ट केले. मात्र त्याचवेळी भाजपचे पदाधिकारी शिवसेनेचा उमेदवार कसा पडेल, यासाठीच प्रयत्न केले, हा विश्वासघातच असून भाजपने पाठीत खंजीर खुपसला असा आरोपही त्यांनी केला. भाजपच्या याकाटकारस्थानामुळेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी युती तोडण्याचा निर्णय योग्य असल्याचेही ते म्हणाले.

ज्या वेगाने भाजपा मोठी झाली त्याच्या दुप्पट वेगाने ती खाली खाली कोसळत आहे. मागील लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना होती म्हणून लोकांनी भाजपाच्या उमेदवारांना जिंकून दिले. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचा एकही खासदार निवडून येणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.