शिवसेनेच्या वाघाचे कासव झाले, अजित पवारांची खोचक टीका

नांदेड: गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र सरकार जोरदार अभ्यास करत आहे, मात्र, त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळत नाही आहे. आता लहान मुलांना सुद्धा प्रश्न पडला आहे की आम्ही पास होतो आहोत तरीही सरकार का पास होत नाही, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा मराठवाड्यात सुरुच आहे. याच हल्लाबोल यात्रेदरम्यान अजित पवार आणि धनंजय मुंडे लोहा दौऱ्यावर होते. त्याचवेळी अजित पवारांनी सरकारवर टीका केली. याचबरोबर त्यांनी शिवसेनेवरही टीकेचे ताशेरे ओढले.

यावेळी ते म्हणाले, राष्ट्रवादीने १५ वर्षे काँग्रेससोबत सरकार चालवले. मात्र,एका पक्षाचा आमदार दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी स्टेजवर गेला नव्हता. बाळासाहेबांच्या काळात शिवसेना हा पक्ष वाघासारखा होता. मात्र, आता सेनेच्या वाघाचे आता शेळी झाली. मग शेळीचा ससा झाला आणि त्यानंतर ससाचे कासव झाले आहे, अशीही टीका अजित पवारांनी केली.

यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनीही यावेळी सरकारवर टीका केली. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमावर १ लाख रुपये खर्च होतो आणि मुख्यमंत्र्यांच्या मेकअपवर आणि लाईटवर २६ लाख रुपये खर्च होतो.’असा टोलाही लोहा येथे झालेल्या सभेत धनंजय मुंडे यांनी लगावला.

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला उस्मानाबादमधून सुरूवात झाली. या आंदोलनात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. तर समारोप औरंगाबादमध्ये होणार आहे. समारोपाच्या सभेला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तर २२ फेब्रुवारीपासून हल्लाबोल आंदोलनाचा तिसरा टप्पा उत्तर महाराष्ट्रातून सुरू होणार आहे.