शरद पवारांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यावर ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : भीमा-कोरेगावमधील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी संपूर्ण राज्यात बंद पाळण्यात आला. वातावरण अजूनही निवळले नसतानाच या प्रकरणावरून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर समाजमाध्यमांवर सचित्र संदेश प्रसारित करण्यात आला आहे. ‘देशहितासाठी शरद पवारसारख्यांची हत्या केली तरी पाप लागणार नाही’, अशी आक्षेपार्ह टीका समाजमाध्यमांवर नोंदविणाऱ्या व्यक्तीविरोधात ठाणे पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. अटकेच्या कारवाईसाठी पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ या फेसबुक पेजवर हा संदेश प्रसारित करण्यात आला आहे. या संदेशावर अवधूत प्रकाशराव शिंदे याने एक प्रतिक्रिया नोंदविली असून त्यामध्ये ‘देशहितासाठी शरद पवार सारख्यांची हत्या केली तरी पाप लागणार नाही’, असे म्हटले आहे. या प्रतिक्रियेच्या पाश्र्वभूमीवर आमदार जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह स्थानिक नेत्यांनी शुक्रवारी सकाळी ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेऊन संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, परांजपे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी सायबर गुन्हे अन्वेषण शाखेने गुन्हा दाखल केला असून संबंधित व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी दिली.