वाढदिवसानिमित्त खडसेंचं शक्तीप्रदर्शन, विरोधकांसह स्वकियांबाबतही टोलेबाजी

eknath-khadse

जळगाव : जळगावात वाढदिवसानिमित्त माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. सत्ता नसतानाही कार्यकर्त्यांचं प्रेम कायम पाहून भरुन आल्याचं एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात म्हटलं आहे.

आपल्याविरोधात कोणताही पुरावा नव्हता मात्र भाजप बदनाम होऊ नये म्हणून राजीनामा दिल्याचं खडसेंनी म्हटलं आहे. मी 40 वर्ष पक्षासाठी खर्च केली, पण नवखे येऊन मंत्री झाले, अशी खंतही खडसेंनी व्यक्त केली आहे.  आपण सगळ्यांशी लढू मात्र घरच्यांशी लढणार नसल्याचं खडसेंनी स्पष्ट केलं आहे.

64 व्या वाढदिवसानिमित्त सकाळी खडसेंनी संत मुक्ताई मंदिरात अभिषेक पूजा केली. यानंतर केक कापून शहरातून खडसेंची मिरवणूक काढण्यात आली. खडसेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर उपस्थित होते. खडसे आज ना उद्या आरोपांमधून बाहेर येतील असा विश्वास यावेळी दानवे आणि फुंडकर यांनी व्यक्त केला आहे.