राज्य सरकार घोषणांच्या पलिकडे काहीच करत नाही : अजित पवार

लातूर: राज्य सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडले असून घोषणांपलिकडे काहीही केले जात नाही आणि केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होत नसल्याची टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचे जिल्ह्यात शुक्रवारी आगमन झाले. त्यानिमित्ताने अजित पवार हे लातुरात आले होते. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रवक्ते नवाब मलिक, आ. विक्रम काळे, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष माजी आ. बाबासाहेब पाटील, शहराध्यक्ष मकरंद सावे आदींची उपस्थिती होती.

अजित पवार म्हणाले, एकीकडे कापसाला भाव मिळत नाही तर बोंडअळीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नाही. कापूस संपल्यानंतर भाव वाढले आणि त्याचा फायदा शेतक-यांना न होता व्यापा-यांना होत आहे. कर्जमाफीची घोषणा झाली. पण त्याचा प्रत्यक्ष लाभ होताना दिसून येत नाही. ज्या शेतक-यांनी कर्जाची वेळेवर परतफेड केली, त्यांना जाहीर करण्यात आलेले २५ हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळत नाही. बेरोजगारांची समस्या. ओबीसी, अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदी अनेक प्रश्न रेंगाळत पडले आहे. एकंदरित, राज्यातील सत्ताधाºयांनी शेतक-यांना वा-यावर सोडले आहे.

शेजारील तेलंगणा राज्यात शेतक-यांना २४ तास मोफत वीज दिली जात आहे. पण आपल्या राज्यात शेतक-यांना ८ तास वीज हे सरकार देऊ शकत नाही. ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी ५० हजार रुपये मागितले जात आहेत, असा आरोपही अजित पवार यांनी केला.