राज्यात प्रथमच सोलापुरात ५४ विधवांना रिक्षापरवाने

मरण पावलेल्या रिक्षाचालकांच्या विधवा पत्नींच्या नावे रिक्षा परवाना नोंद करण्याचा प्रयोग सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने हाती घेत आतापर्यंत ५४ विधवांना रिक्षा परवाने दिले आहेत. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा केला जात आहे.

सोलापूर शहरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे परवानाधारक रिक्षांची संख्या ८५९३ इतकी आहे. शहराची लोकसंख्या सुमारे दहा लाखांपर्यंत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत रिक्षांची संख्या अपुरी आहे. रिक्षांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. या पाश्र्वभूमीवर एकीकडे अधिकृत परवानाधारक रिक्षांची संख्या कमी असताना दुसरीकडे अनधिकृत व आयुष्मान संपलेल्या रिक्षांची संख्या वाढली आहे. यापूर्वी २००७ साली दीड हजार रिक्षांचे वाढीव परवाने वितरित केले गेले होते.  दरम्यान, काही रिक्षापरवानाधारक मरण पावले. यातच शहरातील पालिका परिवहन उपक्रमाची प्रतिकूल स्थिती पाहता रिक्षा परवान्यांची संख्या वाढविण्याची मागणी पुन्हा पुढे आली. त्याचा विचार करून सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी परिवहन प्राधिकरणाच्या जिल्हास्तरीय बैठकीत रिक्षा परवाना नूतनीकरणाच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला. जे परवानाधारक रिक्षाचालक व मालक मरण पावले आहेत, त्यांच्या विधवा पत्नीला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मृत पतीचे परत गेलेले रिक्षा परवाने विधवा पत्नींच्या नावे हस्तांतरण करण्यास मंजुरी दिली. हा निर्णय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला असता त्यास शासनानेही मंजुरी दिली. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी मृत रिक्षापरवानाधारकांच्या विधवा पत्नींकडून अर्ज मागविले. यात ११८५ अर्ज प्राप्त झाले. या अर्जातून १९८५ सालापासूनची यादी तपासल्यानंतर त्यातून ५४ रिक्षा परमिट विधवांच्या नावे हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली.