राज्यात कुणालाही पाठिंबा नाही, निवडणुकांना सामोरे जाऊ: शरद पवार

Sharad Pawar

नांदेड:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवडणुकांनंतरचे वर्तन पाहता ते सत्तेतून बाहेर पडतील, असे वाटत नाही. पण बाहेर पडले तर मध्यावधी निवडणुकांना जाण्यासाठी सज्ज आहोत. भाजपा-शिवसेना युती तुटल्यामुळे राज्यापुढे मध्यावधी निवडणुकीचा पर्याय असू शकतो पण सत्ता सर्वांना प्रिय आहे, निवडणुकीपुर्वी भाजपा-शिवसेनेने तोडलेली युती पुन्हा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकाचा प्रश्नच नाही. जर शिवसेनेने सत्ता सोडली तर आम्ही राज्यात कोणालाही पाठिंबा देणार नाही, तर निवडणुकीला सामोरे जाऊ असे शरद पवार नांदेड येथे म्हणाले.

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये युती करण्यासाठी ते अशोक चव्हाण यांची भेट घेण्यासाठी आले होते. राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आघाडीसाठी शरद पवारांनी काँग्रेसबरोबरच्या आघाडीला संमती दर्शवली आहे. यामुळे राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये आघाडीची सत्ता स्थापण होणार आहे. मुंबईतील काँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार यावर बोलताना ते म्हणाले की मुंबईबाबतचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील’ मुंबईबाबत कॉंग्रेसचे काय धोरण आहे माहीत नाही असे ते म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाली आहे. आघाडी झाली तर राज्यातल्या 17 ते 18 जिल्हा परिषदांमध्ये सत्ता येईल. मुंबईत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो, असे पवार म्हणाले.

मुंबईत राष्ट्रवादी कुणाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे. कारण राष्ट्रवादीने मुंबईत 9 जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष आहे. मात्र भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजप आणि शिवसेनेत दोन जागांचा फरक आहे. पण शिवसेनेने अपक्ष मिळून त्यांचा आकडा वाढवला आहे. मुंबईचा कारभार सुरळीत चालावा एवढीच राष्ट्रवादीची भूमिका आहे. शिवसेनेकडून उमेदवारांची जुळवाजुळव केली जाईल, पण वेळ आलीच तर पाठिंबा देण्याबाबत स्थानिक नेते विचार करतील, असे संकेतही शरद पवारांनी दिले.

मुंबईत भाजपचे 82, शिवसेनेचे 84 उमेदवार निवडून आले आहेत. मात्र शिवसेनेला 4 अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ आता 88 झालं आहे. तर राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीचे नगरसेवकही महत्वाची भूमिका बजावू शकतात.

दरम्यान काँग्रेसचे 31 नगरसेवक निवडून आले असले, तरी त्यांनी भाजपला पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. शिवसेनेने पाठिंबा देण्याबाबत विचारणा केली होती, मात्र शिवसेनेलाही पाठिंबा देणार नाही, असे मुंबईचे काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी म्हटले होते.