मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडकरी वाड्यावर

नागपूर : महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामांकांसाठी ऑन लाईन अर्ज दाखल करण्यासाठी फक्त उद्याचा दिवस शिल्लक असल्याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहचले आहे.

शिवसेने सोबत काडीमोड झाल्याने भाजपला स्वबळावर निवडणूक लढावी लागणार आहे. संपूर्ण राज्यातील महापालिका आणि जिल्हापरिषद काबीज करण्यासाठी उमेदवार निश्चितीसाठी दोन्ही नेत्यांना ततारेवरची कसरत करावी लागत आहे. नागपूर आणि मुंबई महापालिका निवडणूक मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठतेची केली आहे. मात्र पक्षात बंडखोरी होऊ नये यासाठी उमेदवारी कोणाला द्यायची ह्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार उद्या ऑन लाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने मुंबईहून नागपुरात दाखल झाले असून ते सध्या गडकरी यांच्या निवासस्थानी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यास व्यस्त असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. आज सायंकाळपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.