महावितरणच्या सक्त वसुली मोहिमेमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ – अजित पवार

लातूर : एकीकडे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मदत दिली जात नाही, या संपूर्ण प्रकारामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असतानाच आता महावितरणच्या वीजबिलाच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे’, असा घणाघाती आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

लातूर जिल्हयातील औसा तालुक्यातील उजनी गावातल्या शहाजी राठोड या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, या शेतकऱ्याची अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली व उपचारांसाठी त्यांना एक लाख रुपयांची मदत केल्यानंतर लातूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदत्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

सरकारने घेतलेल्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. असा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला. त्रासून गेल्यानंतर, कंटाळून गेल्यावर, पैसा येणं बंद झाल्यावर माणसाला जगावेसे वाटत नाही. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत. राठोड यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांनी मुख्यमंत्री निधीतून मदत मागण्याचा प्रयत्न केला. परंतु ही आत्महत्या असल्याने अशी मदत करता येत नाही असे शेतकऱ्याच्या नातेवाईकांना सरकारतर्फे सागंण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस आत्महत्येचे समर्थन करत नाही. आत्महत्या करणे चुकीचे आहे परंतु अशा दुर्देवी घटना घडल्यावर मदतीची भूमिका ठेवली पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.

मागील दोन- तीन वर्ष सतत दुष्काळाची स्थिती होती. त्यामुळे याकाळातील वीजबिल वसूल करणे न्यायसंगत नाही. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मागच्या काळातील बिल पाठवून त्याची वसुली करण्याचा सपाटा लावला आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला. मराठवाड्यातील हल्लाबोल आंदोलनाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. जनता सरकारच्या धोरणांना वैतागली असून आता ते हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र आले आहे. असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.