भाजपची पहिली यादी जाहीर ,पण मोदींच्या आदेशाला केराची टोपली

bjp-flags

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली असून किरिट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या याच्यासह राज पुरोहितांचा मुलगा आकाश पुरोहितलाही भाजपने उमेदवारी दिली आहे. यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील सभेत कुटुंबातील व्यक्तीसाठी तिकीट मागू नका, तसेच पक्षातील नेत्यांच्या नातेवाईकांना संधी देणे टाळावे, असं भाजप नेत्यांना बजावलं होतं.
मात्र मोदींच्या या संकेताला केराची टोपली दाखवत पक्षातील नेत्यांच्या मुलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी दिली आहे.

बुधवारी रात्री उशिरा जाहीर केलेल्या यादीत विक्रोळीचे मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे आणि मुंबादेवी येथील माजी आमदार अतुल शहा यांना भाजपने तिकीट दिले आहे.
जाहीर झालेल्या या पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान नगरसेवकांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. तर मनसेतून भाजपमध्ये आलेल्या भालचंद्र अंभोरे यांना ही संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत नऊ गुजराती भाषिकांनाही पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

दरम्यान, भाजपने यादी जाहीर न करता त्या त्या वॉर्ड मधील उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत. सध्या दक्षिण मुंबईतील उमेदवारांना निरोप गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. राज पुरोहित यांचा मुलगा आकाश उद्या ( शुक्रवारी) अर्ज भरणार असल्याचे समजते. ज्या जागांवर वाद नाही त्या जागेवरील उमेदवार शुक्रवारी फार्म भरणार आहेत. ३ फेब्रुवारी ही फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे.