पाकिस्तानला अद्दल घडवा, बीएसएफ प्रमुखांचे आदेश

नवी दिल्ली: भारत-पाक सीमेवर तणाव सुरु असून पाकिस्तानकडून आता तर आंतरराष्ट्रीय सीमेवर नेहमीच शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात असल्याने सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी लष्कराला पारिस्तानविरोधी कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिले आहे.

ते म्हणाले, पाकिस्तानच्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा कॉन्स्टेबल ए. सुरेशलाही हकनाक शहीद व्हावे लागले आहे. सुरेशचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. सुरेशचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. बीएसएफचा कॉन्स्टेबल बंकरमध्ये असताना एक गोळी लागून तो शहीद झाला.

सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला मागच्या काही महिन्यात भारतीय लष्कराने अनेकदा चांगलीच अद्दल घडवली आहे. भारताच्या या धडक कारवाईचा पाकिस्तानने चांगलाच धसका घेतला आहे. नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी भारताला डीजीएमओ स्तराच्या बैठकीचे निमंत्रण देण्यावर पाकिस्तानात विचार सुरू आहे.

डॉन या पाकिस्तानी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार डीजीएमओ स्तराची बैठक घेण्यावर पाकिस्तान विचार करत आहे. पाकिस्तानकडून अद्यापपर्यंत तरी डीजीएमओ स्तराच्या बैठकीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. असा प्रस्ताव आल्यास वरिष्ठ पातळीवर योग्य निर्णय घेतला जाईल, असे एका इंग्रजी वृत्तपत्राच्या दिल्लीतील सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.