नांदेड येथे लाच स्वीकारतांना आयपीएस अधिकार्‍याला अटक

Nanded IPS

नांदेड: रेतीची कारवाई थांबवण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेणार्‍या प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी तथा नांदेड इतवारा पोलिस ठाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकार्‍यास पकडण्यात आले. ही कारवाई मंगळवारी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड येथे केली.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी जी.विजय कृष्णन यादव हे नांदेड येथे येण्यापूर्वी ते अमरावती येथे उपविभागीय पोलिस अधिकारी होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची अमरावतीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलिस ठाण्या अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत रेतीचा ट्रक पकडला होता. या प्रकरणी एका आरोपीस गुन्ह्याच्या प्रकरणात अटक न करण्यासाठी तसेच चार्जशीट दाखल करण्यासाठी मदत केल्याचा मोबदला म्हणून दोन लाख रुपयांची मागणी केली होती. यातील एक लाख रुपये पहिल्या टप्‍प्यातत घेण्याचे ठरले.

ठरल्याप्रमाणे आयपीएस अधिकारी जी. विजय कृष्णन यादव यांचे खासगी सहकारी असलेले सन्निसिंग इंदरसिंग बुगई याला लाचेच्या मागणीपैकी पहिली हप्ता म्हणून एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. सदरची लाच ही आयपीएस अधिकारी जी. विजय कृष्णन यादव यांच्यासाठी घेतल्याची कबुली सन्निसिंग इंदरसिंग बुगई याने दिली. मंगळवारी एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. ही सर्व रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.