नवीन कपडे न घेतल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या

विवाहित बहिणीच्या चोळीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणासाठीही नवीन कपडे आईने खरेदी केले नाहीत म्हणून निराश झालेल्या एका १२ वर्षांच्या शाळकरी मुलाने घरात स्वत: साडीने गळफास लावून आत्महत्या केली. शहरातील शेळगी येथे बसवेश्वरनगरात हा प्रकार घडला. समर्थ नागनाथ लिगाडे असे  मुलाचे नाव आहे.

समर्थची घरची परिस्थिती अतिशय हालाखिची असून त्याचे वडील तीन वर्षांपूर्वी मरण पावले. तर आई शारीरिक अपंग आहे. समर्थ व त्याच्या भावाचे पालनपोषण त्याचा मामाकडून होत आहे. समर्थच्या विवाहित बहिणीचा चोळीच्या कार्यक्रमात समर्थने नवीन कपडय़ांचा हट्ट धरला होता.

 

नव्या कपडय़ांसाठी घर सोडणाऱ्या मुंब्रा येथील मुली पालकांच्या स्वाधीन

मनमाड : ठाणे-मुंब्रा येथून घरातून रागावून रेल्वेने रात्रीच्या वेळी निघालेल्या दोन अल्पवयीन मुलींना रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी इगतपुरी येथे ताब्यात घेत सुखरुपपणे पालकांच्या स्वाधीन केले. नवीन कपडय़ांचा हट्ट पालकांनी पुरविला नाही म्हणून शालेय शिक्षण घेणाऱ्या या मुली थेट अमृतसरकडे निघाल्या होत्या. रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे त्यांना पुन्हा आपल्या घरी जाणे शक्य झाले.

कपडे घेण्याचा हट्ट पालकांनी पूर्ण केला नाही म्हणून रागावलेल्या या मुली ठाणे येथून दादर-अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेसने निघाल्या. इगतपुरी-मनमाड दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी गाडीत तपासणी करताना त्यांना अल्पवयीन मुली संशयास्पद अवस्थेत दिसल्या. विचारणा केल्यावर सर्व प्रकार उघड झाला. ठाणे जिल्ह्य़ातील मुंब्रा येथे राहणाऱ्या दळवी कुटुंबातील या दोन्ही मुली इयत्ता चौथी आणि नववी इंग्रजी शाळेत शिक्षण घेतात. रात्री पालकांकडे त्यांनी नवीन कपडय़ाचा हट्ट धरला होता.

 

पिंपळ वृक्ष उन्मळून एकाचा मृत्यू

मुलुंड ; मुलुंड पश्चिम येथील महाराणा प्रताप चौक येथे मंगळवारी दुपारी िपपळवृक्ष उन्मळून पडल्याने झालेल्या अपघातात तीन वाहनांचे नुकसान झाले त्याचप्रमाणे एका इस्त्रीवाल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात शैलेश रामदास कनोजिया हे ४५ वर्षांचे गृहस्थ मृत्यूमुखी पडले आहेत.

मुलुंड पश्चिम येथील महाराणा चौकात सिमेंट कॉलनीकडे दिशेला असलेले जुना िपपळवृक्ष दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उन्मळून पडला. यावेळी येथे उभी असलेली एक रिक्षा, टॅक्सी कार आणि एक खासगी सॅन्ट्रो कार हा वृक्ष पडल्याने चेपली गेली.

मात्र याचवेळी ठाण्याच्या श्रीनगर भागात राहणारे कनोजिया हे आपल्या सायकलवरून इस्त्री केलेले कपडे घेवून ते चालले असताना त्यांच्या अंगावर या झाडाची फांदी कोसळली त्यात ते जखमी झाले त्यांना पालिकेच्या अग्रवाल रूग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यात उजव्या बाजूच्या बरगड्या तुटल्याचे वैद्यकीय चाचणीत निष्पन्न झाल्याने त्याला सायन रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीसांनी सांगितले.