दीपिका ,विरुष्का इन्स्टाग्राम पुरस्काराचे मानकरी

नवी दिल्ली : इन्स्टाग्रामने नुकत्याच जारी केलेल्या पुरस्कारामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या जोडीसह बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन इन्स्टाग्राम पुरस्काराचे मानकरी ठरले आहे . इंन्टाग्रामकडून पहिल्यांदाच भारतामध्ये या पुरस्कारांची घोषणा केली. यात इन्स्टाग्राम अॅपवर सर्वाधिक लाइक्स आणि एंगेजमेंट असणाऱ्या अकाऊंटधारकाचा गौरव करण्यात आला. यामध्ये दीपिका आणि विराटने वेगवेगळ्या वर्गवारीत अव्वल स्थान मिळवले.

आपल्या अदाकारीने आणि अभिनयाने लाखो चाहत्यांना घायाळ करणाऱ्या दीपिकाने ‘Most Followed Account’ वर्गवारीतील पुरस्कार पटकावला. यापूर्वी दीपिकाला सर्वाधिक फॉलोअर्स झाल्यानंतर विशेष ट्राफी देण्यात आली होती. इन्स्टाग्रामवर दीपिका पादुकोनचे सर्वाधिक फॉलोवर्स आहेत. तर विराट कोहली ‘Most Engaged Account’ या वर्गवारीत अव्वल आहे.

याशिवाय गेल्यावर्षी विराट-अनुष्काच्या व्हायरल झालेल्या फोटोलाही पुरस्कार देण्यात आला. २०१७ मधील सर्वाधिक पसंती मिळवलेल्या विरुष्काच्या लग्नाच्या फोटोला इन्स्टाग्राम पुरस्काराच्या यादीत स्थान मिळाले आहे. या फोटोला ४५ लाख लाइक्स मिळाल्या होत्या. जगभरातील अॅपच्या तुलनेते फोटो शेअरिंगमध्ये इंन्स्टाग्राम अॅप अग्रस्थानी आहे. फेसबुकने खरेदी केलेल्या इन्स्टाग्राम वापरकरणाऱ्यांची संख्या ८०० मिलियन इतकी आहे.